28 October 2020

News Flash

मेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज

फेऱ्यांची संख्या निम्म्यावर, प्रवासी क्षमता एकतृतीयांश

फेऱ्यांची संख्या निम्म्यावर, प्रवासी क्षमता एकतृतीयांश

मुंबई : सर्व मुंबईकरांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अध्र्यावर आणण्यात आली आहे. सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासी प्रवास करू शकतील.

टाळेबंदीत ठप्प झालेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून कार्यरत होत आहे. अंतरनियम आणि आरोग्य सुरक्षेसंदर्भात मेट्रो रेल्वे आणि स्थानकांवर व्यवस्थापनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारपासून मेट्रोची वारंवारिता साडेसहा ते आठ मिनिटांवर आणण्यात आली आहे. करोनापूर्व काळात हीच वारंवारिता तीन ते पाच मिनिटे इतकी होती. त्यामुळे करोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होतील, असे मिश्रा यांनी सांगितले. सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.

प्रवासी संख्येवरदेखील नियंत्रण आणले असून एका फेरीत १३५० प्रवाशांऐवजी ३६० प्रवासीच आता प्रवास करू शकतील. प्रत्येक गाडीचे दररोज रात्री र्सवकष र्निजतुकीकरण केले जाईल, तसेच प्रत्येक फेरीनंतरदेखील र्निजतुकीकरण करण्यात येईल, असे मिश्रा यांनी या वेळी सांगितले.

मेट्रोने प्रवास करताना..

’ मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश.

’ एक सोडून एक आसनव्यवस्थेमुळे १०० प्रवासी बसून प्रवास करू शकतील.

’ उभे राहून प्रवास करण्यास २६० प्रवाशांना परवानगी.

’ प्लास्टिक टोकन बंद.

’ कागदी तिकिट अथवा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल तिकिटाचा वापर.

’ रिचार्ज कार्डावरील शिल्लक रकमेवर परिणाम होणार नसून, सहजपणे वापरता येईल. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

’ स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी केवळ दोन ते चार मार्गाचाच वापर करता येईल.

’ प्रत्येक स्थानकात गर्दीनुसार ३० ते ६० सेकंदांचा थांबा.

’ वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २५ ते २७ सेंटिग्रेड इतके ठेवले जाईल, तसेच ताजी हवा येण्यासाठी काही बदल केले जातील.

’ सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या काळात मेट्रो रेल्वेगाडय़ा धावतील.

मेट्रो-१ चे ३२ कर्मचारी करोनाबाधित

टाळेबंदीच्या काळात मेट्रो स्थानके आणि रेल्वेगाडय़ांची देखभाल करण्यासाठी मेट्रो-१ चे सुमारे ३०० कर्मचारी कार्यरत होते. यापैकी एकूण ३२ कर्मचारी करोनाबाधित झाले. त्यापैकी २८ जण करोनामुक्त झाले असून चौघे उपचाराधीन आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच राज्य सरकारच्या परवानगीनंतर इतक्या लवकर मेट्रो सुविधा सुरू करणे शक्य झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर उद्यापासून आणखी २२५ लोकल फेऱ्या

’ मध्य रेल्वेवर सोमवार, १९ ऑक्टोबरपासून आणखी २२५ उपनगरी रेल्वे (लोकल) फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ४८१ वरून ७०६ वर पोहोचेल. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा या मुख्य मार्गावर धिम्या लोकल फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

’ मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ४९९ फेऱ्या धावतील. यामध्ये ३०९ फेऱ्या धिम्या, तर १९० फेऱ्या जलद मार्गावर आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरील फे ऱ्यांची संख्या १८७ होणार असून ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर एकूण फेऱ्या २० पर्यंत होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

’ याआधी ट्रान्स हार्बरवरील काही स्थानकांत लोकल थांबत नव्हत्या. मात्र सोमवारपासून मानसरोवर स्थानक सोडता लोकल सर्व स्थानकांत थांबतील.

’ हार्बरवरील लोकलही रे रोड, कॉटनग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबत नाहीत. ट्रान्स हार्बर आणि हार्बरवरील या स्थानकांतही लोकल गाडय़ांना थांबा देण्याचा निर्णय येत्या आठवडय़ात होणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:56 am

Web Title: metro train ready for service from tomorrow zws 70
Next Stories
1 प्रभाग समिती निवडणुकीतील अवैध मतावरून भाजप आक्रमक
2 पावसामुळे हजारो किलो झेंडू वाया
3 Coronavirus : मुंबईत दिवसभरात १,७९१ करोनाबाधित
Just Now!
X