वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत आज प्रस्ताव

मुंबई : जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्यावरील ‘मेट्रो-६’च्या स्थानकाआड येणारी १८६ झाडे हटविण्यास परवानगी मिळावी, यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आरे वसाहतीमधून क्षेत्र आरक्षित करून मेट्रोची कारशेड अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेणारी शिवसेना या झाडांबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या ‘के-पूर्व’ विभागाच्या हद्दीतील जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्यावरील प्रताप नगर ते शामनगर तलाव परिसरातील ‘मेट्रो-६’च्या कामात १८६ झाडे अडथळे बनली आहेत. यापैकी ४८ झाडे कापण्यास आणि १३८ झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने पालिकेच्या उद्यान विभागाला पाठविला होता. उद्यान विभागातील कनिष्ठ वृक्ष अधिकारी आणि के-पूर्व विभाग कार्यालयातील साहाय्यक उद्यान अधीक्षकांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधींसोबत या जागेची पाहणी केली. या परिसरात १,१३२ झाडे आहेत.‘ मेट्रो-६’चे स्थानक आणि स्तंभाच्या बांधकामात यापैकी १८६ झाडे अडथळा बनली आहेत. त्यामुळे ती हटविण्यास परवानगी मिळावी यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी

वृक्ष प्राधिकरण समितीची शुक्रवारी होणारी बैठक सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. पालिका आयुक्तांच्या दालनात अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका, भेटी होत आहेत. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होण्यास काहीच हरकत नाही, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन नुकतेच पार पडले. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत ३५० आमदार अधिवेशनात सहभागी झाले होते. ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत कोण काय बोलते ते समजत नाही. अनेक विषय पारित केले जातात. पण तेही सदस्यांना कळतही नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय या समितीच्या बैठकीत सादर होत असतात. त्यामुळे बैठक प्रत्यक्ष उपस्थितीतच घ्यावी, अशी मागणी अभिजीत सामंत यांनी केली आहे.