धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

म्हाडा प्राधिकरण हे घोटाळ्यांचे आगार झाले असून, गेल्या साडेतीन वर्षांत त्यांना परवडणारे एकही घर बांधता आले नसले तरी कोटय़वधी रुपयांचे घोटाळे मात्र राजरोस सुरू असल्याचा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सरकारवर चढवला. पवई येथील १० हजार चौरस मीटरचा भूखंड न्यायालयात खोटे शपथपत्र सादर करून म्हाडा अधिकाऱ्यांनी पॉपकॉर्न इंडस्ट्रीजला कसा दिला याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच द्यावे, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले.

म्हाडामध्ये केवळ खासगी विकासकांचेच चांगभले करण्याचे उद्योग अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून पॉपकॉर्न इंडस्ट्रीजला दिलेला मोक्याचा भूखंड हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या जागेची बाजारभावानुसार किंमत १६०० कोटी रुपये आहे. १९९९ साली हा भूखंड जयकृष्ण इंडस्ट्रीजला हॉटेल बांधण्यासाठी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र, त्यानंतर सत्ता बदलताच हा निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर २००४ साली सदर भूखंड हॉटेल व्यवसायासाठी ९० वर्षांच्या भाडेपट्टय़ावर देण्यासाठी खुल्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात पॉपकॉर्न कंपनीने २२ कोटी २२ लाख रुपयांचा सर्वोच्च देकार दिला आणि म्हाडाने त्यांच्याकडून पाच कोटी ५५ लाख रुपये इतकी रक्कम जमा करून घेतली. या निविदेला जयकृष्ण इंडस्ट्रीजने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या कोर्टबाजीत बराच कालावधी लोटल्यानंतर जमिनीच्या वाढत्या किमती आणि पॉपकॉर्न व जयकृष्णकडून मिळत असलेली रक्कम यातील तफावत लक्षात घेऊन म्हाडाने जमीन देण्याचा निर्णय रद्द केला. त्याविरोधात दोन्ही कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१४ मध्ये पॉपकॉर्नच्या नवीन प्रस्तावावर विचार करावा व त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे सांगितले. दरम्यान,  म्हाडाने २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र करून म्हाडातर्फे सदर जागेवर गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी परवानगी मागितली. यानंतर अचानक म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याच भूमिकेत वेळोवेळी बदल केल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये न्यायालयाने याचिका रद्द केली असली तरी म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खोटय़ा शपथपत्राने पॉपकॉर्न प्रॉपर्टीजचा या भूखंडावर दावा निर्माण झालेला आहे.सदरची बाब शासनाच्या निदर्शनास येऊन चार महिने झाले तरीकोणावरही जबाबदारी का निश्चित करण्यात आली नाही असा सवाल मुंडे यांनी केला.