06 August 2020

News Flash

म्हाडा वसाहतींना अतिरिक्त एफएसआय

या वसाहतींमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

 

  • अभिन्यास मंजुरीमुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
  • पंतनगर, नेहरूनगरसह सहा वसाहतींना दिलासा

मुंबईमधील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात अडथळा ठरलेल्या अभिन्यास मंजुरीबाबत म्हाडा आणि महापालिकेकडून अंगुलीनिर्देश केला जात असतानाच पालिकेने पुढाकार घेत आणखी सहा अभिन्यासांना मंजुरी दिली आहे. म्हाडाकडून सादर झालेल्या ३७ पैकी पालिकेने याआधी दोन अभिन्यासच फक्त मंजूर केले होते. आता नव्याने सहा वसाहतींचे अभिन्यास मंजूर करून अतिरिक्त (प्रोरेटा) चटईक्षेत्रफळ (एफएसआय) मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे या वसाहतींमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

म्हाडाच्या ५६ वसाहती असून १०४ अभिन्यास आहेत. अभिन्यास मंजुरीशिवाय संपूर्ण तीन इतके चटईक्षेत्रफळ तसेच प्रोरेटा चटईक्षेत्रफळाचा वापर करता येत नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पालिकेला विशेष समिती स्थापन करण्यास भाग पाडले होते. म्हाडाकडून सादर झालेल्या अभिन्यासात वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून या समितीने अभिन्यास मंजुरीत फारसा रस घेतला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांना तातडीची बैठक घेण्यास भाग पाडले. या बैठकीत वेगवेगळ्या टप्प्यात अभिन्यास मंजूर करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.

म्हाडाकडून सादर झालेल्या ३७ पैकी ११ अभिन्यास तात्काळ मंजूर करण्यात काहीही अडचण नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात सादर झालेल्या ३७ पैकी फक्त दोनच अभिन्यास मंजूर झाले होते. आता पालिकेने एस.व्ही.पी.नगर, आझादनगर (अंधेरी), पंतनगर (घाटकोपर), नेहरूनगर (कुर्ला), कन्नमवारनगर (विक्रोळी) आणि अशोकवन (बोरिवली) हे सहा अभिन्यास मंजूर केले आहेत. उर्वरित पाच अभिन्यासांपैकी जेव्हीपीडी अभिन्यास मंजुरीसाठी आवश्यक रहिवाशांची माहिती म्हाडाने पुरविलेली नाही, तर राजेंद्रनगर (बोरिवली) आणि डी. एन. नगर (अंधेरी) याप्रकरणी म्हाडानेच तीन चटईक्षेत्रफळानुसार सुधारित आराखडा सादर केलेला नाही आणि जुने गोराई व सहकारनगर (चेंबूर) प्रकरणी सादर झालेल्या अभिन्यासातील त्रुटींबाबत म्हाडाकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

अभिन्यास मंजुरीत पालिकेकडून कूर्मगतीचे धोरण अवलंबिले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शनिवारी दिले होते. त्यानंतर पालिकेनेआणखी सहा अभिन्यासांना मंजुरी दिली आहे. मात्र उर्वरित अभिन्यासाबाबत अद्यापही म्हाडा व पालिकेकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. पालिका आयुक्त मेहता यांनी अभिन्यास मंजुरीत समितीने तातडीने निर्णय घ्यावेत असे आदेश दिले आहेत.

अभिन्यास म्हणजे काय?

दोन-तीनपेक्षा अधिक भूखंडांवर इमारत बांधताना या भूखंडावरील आरक्षण, रस्ते तसेच उद्यान आदींचा नियोजित आराखडा उपलब्ध मूळ चटईक्षेत्रफळ तसेच अतिरिक्त (प्रोरेटा) चटईक्षेत्रफळासह तयार केला जातो, त्याला अभिन्यास म्हणतात. अभिन्यासामुळे प्रत्येक इमारतीला किती चटईक्षेत्रफळ उपलब्ध आहे, याची माहिती उपलब्ध असते. अभिन्यास मंजूर न झाल्यास पालिकेकडून चटईक्षेत्रफळाचे वाटप केले जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 2:01 am

Web Title: mhada colonies get extra fsi
Next Stories
1 खरा काळाघोडा राणीच्या बागेतच!
2 सारासार : पर्वतांची उंची
3 गॅलऱ्यांचा फेरा : नवख्यांनाही निमंत्रण!
Just Now!
X