मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ ‘म्हाडा कडून मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात आठ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण फक्त पावसाळ्यापूर्वी न करता सातत्याने सुरू ठेवले जात आहे.  
या अतीधोकादायक इमारतींमध्ये एक्स्प्लेनेड मॅन्शन, ४२-४८ मंगलदास मार्ग आणि १ ते १३ विठ्ठलदास मार्ग, २३०-२३४ संत सेना महाराज मार्ग, १२२ सी गोरागांधी चाळ, खेतवाडी बॅक रस्ता, करिम इमारत क्रमांक २, फॉकलंड मार्ग, ९ वा क्रॉस रस्ता, बादशहा इमारत क्रमांक २७३ ते २८१ फॉकलंड रस्ता, ३९ चौपाटी, सी फेस रस्ता,  ५६-५८, ५८ सी, ५८ बी, ६०-६२ मोतीराम दयाराम चाळ, लोअर परळ यांचा समावेश आहे.
या इमारतीमधील रहिवाशांना या इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली असल्याचे ‘म्हाडा’ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मंडळाचा नियंत्रण कक्ष ०२२-२३५३६९४५/२३५१७४२३ किंवा महापालिका नियंत्रण कक्ष ०२२-२२६९४७२५ ते २७ यावर संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकेल.