महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील पात्र लाभार्थ्यांना सदनिकेचे विक्री शुल्क भरण्यासाठी १५ डिसेंबपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सोडतीतील या लाभार्थ्यांना सदनिकेच्या  विक्री शुल्काचा दिलेल्या वेळेत भरणा करता आलेला नव्हता. त्यामुळे लाभार्थ्याकडून विक्री शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे सातशे यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. कोकण मंडळातर्फे २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे एक हजार जणांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे.