म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो असे सांगून अनेक लोकांना फसविणाऱ्या एका इसमास घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. िहदुराव श्यामराव शेजवळ (३८) असे या इसमाचे नाव असून हा मूळचा सातारा गावचा असून तो विक्रोळी पार्कसाइट विभागात राहत होता.

मागील दीड वर्ष हा ठग विद्याविहारमधील आलिशान अशा गोल्डन पॅलेस या हॉटेलमध्ये राहत होता. दहावीही न शिकलेल्या या ठगाने आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे.

हा आकडा कोटय़वधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादासाहेब कांबळे या व्यक्तीला या ठगाने असेच म्हाडात स्वस्तात घर घेऊन देतो म्हणून सांगितले, परंतु अनेक दिवस उलटूनदेखील त्याने घर दिले नाही. यावर दादा कांबळे यांनी घाटकोपर पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी या इसमाला अटक केली.

आतापर्यंत सात ते आठ जणांना शेजवळने लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या प्रकरणात म्हाडाचे काही अधिकारीदेखील सामील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या चेंबूर, घाटकोपर, सायन, साकीनाका परिसरातील फसलेल्या नागरिकांनी घाटकोपर पोलिसांशी संपर्क साधला असून आणखी कोणाला अशा प्रकारे फसविले असेल तर त्यांनी घाटकोपर पोलीस ठाणेशी संपर्क करावा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.