विकासकांपेक्षा स्वस्त, पण निर्धारित उत्पन्न गटांच्या आवाक्याबाहेर

मुंबईतील ८१९ घरांसाठी सोडत जाहीर करणाऱ्या मुंबई गृहनिर्माण मंडळाने या घरांच्या किमती खासगी विकासकापेक्षा कमी असल्याचा दावा केला असला तरी ही घरे त्यांच्या कुठल्याच गटातील नागरिकांच्या आवाक्यात येणारी नाहीत.  या घरांची जी किंमत आहे, त्या किमतीतील घरे  परवडणारे लोक म्हाडाच्या निर्धारित उत्पन्न गटात बसू शकत नाहीत. त्याचवेळी जे लोक त्या-त्या उत्पन्न गटात बसतात, त्यांना ही घरे परवडू शकत नाही, असे  स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हाडाला घरांच्या किमती यापेक्षा कमी करता येऊ शकत नाही, अशी कबुली उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर (सायन), मानखुर्द, चांदिवली, मागठाणे (बोरिवली) या ठिकाणी फक्त आठ सदनिका आहेत. कन्नमवारनगर (विक्रोळी), चारकोप (कांदिवली), सिद्धार्थनगर (गोरेगाव), चांदिवली, मानखुर्द, मालवणी, मालाड येथे अल्प उत्पन्न गटासाठी १९२ तर मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षानगर, सिद्धार्थनगर, उन्नतनगर (गोरेगाव), चारकोप, गायकवाडनगर (मालवणी) येथे २८१ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटात लोअर परळ, तुंगा (पवई), चारकोप, शिंपोली (बोरिवली) येथे एकूण ३३८ सदनिका आहेत. म्हाडा घरांचे क्षेत्रफळ हे कारपेट स्वरूपात असते. त्यामुळे वरळीतील ‘म्हाडा’ घराचा दर ३९ हजार प्रति चौरस फूट असला तरी तो कारपेटचा आहे. याच ठिकाणी विकासकाचा कारपेट क्षेत्रफळाचा दर ६० हजारांच्या घरात आहे. या सर्व ठिकाणी खासगी विकासकाचा आणि म्हाडा घरांच्या किमतीची तुलना केली तर म्हाडाची घरे विकासकांपेक्षा स्वस्त असल्याचा दावाही एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने   केला. मात्र उत्पन्न मर्यादेनुसार ही घरे खरेदी करता येतील का, असे या अधिकाऱ्याला विचारले असता, हक्काचे घर असावे यासाठी सामान्य वा मध्यमवर्गीय पुंजी शिल्लक ठेवत असतो. विकासकांकडूनही घर खरेदी करण्याची त्याची तयारी असते.  म्हाडाचे घर सोडतीत मिळाले की, हेच मध्यमवर्गीय घर खरेदी करतात, असा अनुभव असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या म्हाडाच्या स्वस्त सदनिका ?

अल्प उत्पन्न गट  ( मासिक उत्पन्न मर्यादा २५,००१ ते ५०,००० रुपये)

’चांदिवली – २५ ते २६ लाख (१८५ ते २४० चौरस फूट)

’चारकोप, कांदिवली – ३४ ते ३६ लाख (३५२ ते ३७२ चौरस फूट)

’सिद्धार्थ नगर, गोरेगाव – ३० लाख (४१६ चौरस फूट)

’मानखूर्द – २४ लाख (३५९ चौरस फूट)

’मालवणी, मालाड – २२ ते २५ लाख (३०० ते ३२५ चौरस फूट)

’विनोबा भावे नगर, कुर्ला – २८ लाख (३०१ चौरस फूट)

उच्च उत्पन्न गट

(मासिक उत्पन्न मर्यादा

७५,००१ रुपये व पुढे )

’लोअर परळ – एक कोटी ४२ लाख ते एक कोटी ९५ लाख  (३६३ ते ४७५ चौरस फूट)

’तुंगा, पवई – एक

कोटी ३९ लाख (७३९ चौरस फूट)

’चारकोप, कांदिवली – ७१ ते ७३ लाख (६५५ ते ६६५ चौरस फूट)

’शिंपोली, बोरिवली – ७४ लाख (४७६ चौरस फूट)

मध्यम उत्पन्न गट

(उत्पन्न मर्यादा ५०,००१

ते ७५,००० रुपये )

’सिद्धार्थनगर, उन्नतनगर – ३९ ते ५६ लाख (३९० ते ४७८ चौरस फूट)

’चारकोप, कांदिवली – ३४ ते ४२ लाख (३७० ते ४२४ चौरस फूट)

’गायकवाडनगर, मालवणी – ३७ लाख (४३७ चौरस फूट)