जुलैअखेपर्यंत भाडे भरल्यास व्याजात ४० टक्के सवलत

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरूंना थकीत भाडय़ावरील व्याजात ४० टक्क्यांची सवलत देणारी अभय योजना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. पहिल्या दोन टप्प्यांत ११९८ भाडेकरूंनी पाच कोटी ३१ लाख रुपयांचे थकीत भाडे म्हाडाकडे जमा केले आहे. त्यामुळे भाडेकरूंचा प्रतिसाद पाहून म्हाडाने या अभय योजनेला मुदतवाढ दिली असून १ मे ते ३१ जुलैपर्यंतच्या कालावधीत थकीत भाडे भरणाऱ्या रहिवाशांना भाडय़ावरील व्याजात ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

मोडकळीस आलेल्या इमारती जमीनदोस्त केल्याने म्हाडाने निरनिराळ्या ठिकाणच्या संक्रमण शिबिरात दिलेल्या घरांमध्ये २१ हजार १४९ भाडेकरू वास्तव्याला आहेत. म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात पंपमन, इलेक्ट्रिशियन, सुरक्षारक्षक, उद्वाहन देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सफाई कामगार आदी सुविधा पुरविल्या जातात. या सुविधांपोटी म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडून भाडे घेण्यात येते. या भाडेकरूंकडून म्हाडा दरमहा ५०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत भाडे घेते. संक्रमण शिबिरात राहणाऱ्या अनेक भाडेकरूंनी गेल्या कित्येक महिन्यांपासून भाडेच भरलेले नाही. या थकीत भाडय़ावर म्हाडाकडून १८ टक्के दराने व्याज आकारले जाते. या प्रलंबित भाडय़ावरील व्याजाची रक्कमही सद्य:स्थितीत १३० कोटी रुपयांवर पोहचली आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत भाडेकरूंवर व्याजाच्या रकमेचा बोजा पडू नये, यासाठी म्हाडाने या अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीअखेपर्यंत संपूर्ण थकीत रक्कम भरणाऱ्या भाडेकरूंना त्यावरील व्याजात ६० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाडेकरूंनी २८ फेब्रुवारीपर्यंत तीन कोटी ३३ लाख रुपयांचे थकीत भाडे जमा केले होते. तर दुसऱ्या टप्प्यातील सवलतीत ३१ मार्चपर्यंत थकीत भाडे जमा करणाऱ्या भाडेकरूंना व्याजात ४० टक्क्य़ांची सवलत दिली होती. या सवलतीचा लाभ घेऊन भाडेकरूंनी आणखी एक कोटी ९८ लाख रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा केले. दरम्यान, म्हाडाने या योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून म्हाडा संक्रमण शिबिरातील रहिवाशांना व्याजावरील रकमेत ४० टक्के सवलतीत मिळणार आहे.

दीड कोटी रुपये भाडे जमा

अभय योजनेव्यतिरिक्त म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या भाडेकरू रहिवाशांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मिळून एक कोटी ५७ लाख रुपयांचे नियमित भाडे मंडळाकडे जमा केले. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ८५ लाख रुपयांचे, तर मार्च महिन्यातील ७१ लाख रुपयांचे भाडे म्हाडाला प्राप्त झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.