म्हाडाच्या सोडत समारंभात भावभावनांचे दर्शन

हुरहूर, आनंद आणि निराशा या भावभावनांच्या सरमिसळीत रविवारी म्हाडाच्या १,३८४ सदनिकांची सोडत वांद्रे येथील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली.

दिड लाखांहून अधिक अर्जामधून विजेत्यांची निवड करण्यात आली. तुलनेत यंदा मोजके अर्जदार सोडत समारंभाला उपस्थित होते. म्हाडाने आपल्या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहाण्याची व्यवस्था केल्याने बहुसंख्य अर्जदारांनी घर, कार्यालयातून निकाल जाणून घेतला. संकेतस्थळावरील समारंभाचे चित्रण ४९ देशांमधील ४३ हजारांहून अधिक नागरिकांनी पाहिल्याचा दावा म्हाडाने केला.

सकाळी दहाच्या सुमारास अत्यल्प गटासाठी राखीव सदानिकांच्या सोडतीने समारंभाला सुरूवात झाली. अर्ज केलेल्या गटाची सोडत सुरू होताच उपस्थित अर्जदारांच्या चेहेऱ्यावरील उत्सुकता, तणाव स्पष्टपणे जाणवत होता. सोडत रंगू लागली तसतसे गर्दीतून आनंदाने ठोकलेल्या आरोळ्या ऐकू येत होत्या. तिथल्या तिथे पेढे वाटून आप्तांचे तोंड गोड केले जात होते. मात्र निवड झाली नाही म्हणून निराश होत समारंभ स्थळ सोडणारे अनेकजण होते. कितीवेळा अर्ज केला याचा हिशोब मांडत, नशिबाला दोष देत, म्हाडाच्या सोडत पद्धतीवर नाराज होत अपयशी अर्जदार मंडळी निघून जात होती.

शाखाप्रमुखाला दोन महागडी घरे

पेशाने कॉम्प्युटर इंजिनिअर, व्यावसायिक असलेल्या शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना एक नव्हे तर दोन महागडी घरे लागली. राजकीय कार्यकर्त्यांला महागडे घर लागले ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण माझी आर्थिक परिस्थिती आणि राजकारण याचा काडीमात्र संबंध नाही. गेली अकरा वष्रे आयबीएम कंपनीत मी ‘सीनीअर आयटी आर्किटेक्ट’ म्हणून काम करत होतो. काही दिवसांपुर्वी मी ती नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. विविध ठिकाणच्या सदनिकांसाठी आठ अर्ज केले होते. त्यापैकी ग्रॅण्ट रोड येथील धवल इमारतीतील दोन अर्ज सोडतीत निवडले गेले, असे शिर्के सांगत होते. आग्रीपाडा येथील बीआयटी चाळीत राहणारे शिर्के यांना सोडतीत लागलेल्या एका घराची किंमत पाच कोटी ८० लाख तर दुसऱ्या घराची किंमत पाच कोटी इतकी आहे. पाच कोटी १३ लाखांचे घर अख्तर महोम्मद यांनी पटकावले. तर नाशिक येथील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना ९९ लाखांचे घर सोडतीत लागले.

योग्य वेळी नशिबाची साथ

अगदी योग्यवेळी नशीबाने साथ दिली.. सायन-प्रतिक्षा नगर येथील अल्प उत्पन्न गटातील सदनिका जिंकल्यानंतर बाळकृष्ण घाडगे यांची ही प्रतिक्रिया. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून मे महिन्यात घाडगे सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर वसाहतीतला निवारा सोडावा लागला. सध्या ते कुर्ला परिसरात भाडय़ाच्या घरात राहतात.

एकाच कुटुंबात तिघांना घरे

सोडत समारंभासाठी कलानगर येथील म्हाडा कार्यालयात आलेल्यांपैकी कोणालाही रमीझ तडवी या तरूणापेक्षा जास्त आनंद झाला नसावा. तडवी यांच्या घरात तिघांचे अर्ज सोडतीदरम्यान निवडले गेले. एक अर्ज अल्प उत्पन्न गटात अ‍ॅन्टॉपहिल येथील सदनिकेसाठी त्यांनी स्वत: केला होता. तर अन्य दोन अर्ज त्यांच्या आई-वडिलांनी कांदिवलीच्या महावीर नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील सदनिकेसाठी केले होते. हे तिघे विजेते ठरले.

पुढल्या सोडतीत दोन हजार घरांची?

पुढल्या सोडतीत म्हाडाने दोन हजार सदनिकांचे उद्दीष्ट ठेवले आहे. तशा सूचना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंडळातील अधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

रविवारी म्हाडाने १ हजार ३८४ सदनिकांसाठी सोडत काढली. त्यासाठी राज्यभरातून एक लाख ६४ हजार ४५८ अर्ज दाखल झाले. सोडतीला मिळालेल्या प्रतिसादानंतर मेहता यांनी दोन हजार घरांचे उद्दीष्ट मंडळासमोर ठेवले. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मंडळासमोर गोरेगाव येथील प्रकल्पाचा पर्याय आहे. या प्रकल्पांतर्गत मंडळ सात हजार सदनिका बांधणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील काही घरे पुढल्या सोडतीत काढली जाऊ शकतात, असे समजते.

कोकण मंडळाची पाच हजार घरे

म्हाडाच्या कोकण मंडळाने जानेवारीअखेरीस पाच हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मिळते. या सोडतीत कल्याणच्या खोणी भागातील सदनिकांची संख्या सर्वाधिक असेल, असे समजते. ठाणे, कल्याण, विरार, अंबरनाथ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील एकूण नऊ हजार सदनिकांची सोडत कोकण मंडळाने काढली होती.