मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी फक्त म्हाडाचा एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षी म्हाडाची लॉटरी कधी निघणार? त्याची सर्वसामान्यांना प्रतिक्षा असते. म्हाडातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील १,३८४ घरांसाठी आज, रविवारी सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी एक लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वांद्रा येथील म्हाडा गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत पावणेसहा कोटींची दोन घरे आणि एक कोटीपेक्षा अधिक किमतीची ५० हून अधिक घरे आहेत. अल्प उत्पन्न गटातील घरांची किमत २० ते ३५ लाखांपर्यंत तर मध्यम उत्पन्न गटातील घरांची किमत ३५ ते ६० लाख रुपये आहे. या सोडतीत अत्यल्प गटासाठी ६३ सदनिका, तर अल्प गटासाठी ९२६ सदनिका आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनुक्रमे २०१ आणि १९४ सदनिका आहेत. कसे पाहाल? - म्हाडाच्या या वेबसाइटवरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सोडत पाहण्यासाठी वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. याशिवाय सोडतीसाठी म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मैदानात मंडप उभारण्यात आला असून तिथेही सोडतीचे प्रक्षेपण पाहता येणार आहे. अंतिम यादी कधी? सोडतीमधील विजेत्या आणि प्रतीक्षायादीतील अर्जदारांची यादी म्हाडाच्या या वेबसाइटवर रविवारी सांयकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. किंमत फक्त ५ कोटी ८० लाख ! सर्वाधिक किमतीची सदनिका ग्रँट रोड येथील कंबाला हिल परिसरातील धवलगिरी या प्रकल्पात आहे. या ९८६ चौरस फूट सदनिकेची किंमत पाच कोटी ८० लाख आहे. सर्वात कमी किमतीची सदनिका चांदिवली, पवई येथे आहे. १७९ चौरस फुटांच्या या घराची किंमत १४ लाख ६१ हजार आहे. पावणेसहा कोटीची दोन घरे इमारत दुरुस्ती मंडळाकडून म्हाडाला मिळाली आहेत. याशिवाय म्हाडाला मिळालेल्या ५० घरांची किंमत एक कोटीपर्यंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या ठिकाणी मिळणार घरे -