मुंबापुरीमध्ये हक्काचे घर असावे हे स्वप्न सर्वचजण पाहात असतात. दरवर्षी निघणारी ‘म्हाडा’च्या घरांची सोडत या सर्वासाठी एक आशेचा किरण ठरते. त्यामुळे रविवारी ‘म्हाडा’च्या सोडतीचा निकाल पाहण्यासाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर सकाळी ९ वाजल्यापासून अर्जदारांनी तोबा गर्दी केली होती. मुंबईतील १०६३ घरांसाठी आयोजित या सोडतीकडे तब्बल १ लाख २५ हजार ८४४ अर्जदारांचे लक्ष लागले होते.
यंदाच्या सोडतीची सुरुवात कलाकारांच्या घराच्या स्वप्नपूर्तीने झाली, असे म्हणायला हरकत नाही. सकाळी सोडतीची सुरुवात होताच काही मिनिटातच ‘टाईमपास’फेम दगडू अर्थात प्रथमेश परबला सोडतीत घर लागल्याचे जाहीर झाले. त्यानंतर विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनाही सोडतीत घर मिळाले. प्रथमेशने प्रतीक्षानगर आणि मुलुंड येथे कलाकार कोटय़ामधून आपले नाव नोंदविले होते. त्यामध्ये प्रतीक्षानगर येथील घर मिळाले. विशाखा यांना मुलुंड विभागातील घर जिंकले. भाडय़ाच्या घरात रहाणारे कव्वाली गायक भास्कर सपकाळे यांच्या हक्काचे घर मिळविण्याच्या धडपडीला यावर्षी पूर्णविराम मिळाला. कलाकार कोटय़ातून त्यांनाही मुलुंड येथे घर लागले. लष्करात २२ वर्ष कार्यरत असलेले विजय वगारे यांनांही ‘म्हाडा’च्या सोडतीत स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. पोलीस निरीक्षक शशिकांत सावंत यांनाही सोडतीत घर मिळाले. ‘निवृत्तीपूर्वी आपले स्वत:चे घर असावे अशी आपली इच्छा होती. पण मुंबईतील घरांच्या किमती परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे ‘म्हाडा’कडून खूप आशा होत्या,’ असे त्यांनी यावेळी सांगितले. अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या पंचशीला घुगें यांना आज सुखद धक्का मिळाला. विलेपाल्र्याचे घुगे कुटुंब दहा वर्ष घरासाठी धडपडत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना यावर्षी ‘म्हाडा’मध्ये नाव नोंदविण्याच सुचविले आणि त्यांनी घर जिंकलेही. एकीकडे अशा सुखद कहाण्या समोर येत असतानाच याही वर्षी आपले नाव न लागल्याने निराश झालेले चेहरेही सभागृहात होते. पण पुढच्या वर्षी पुन्हा घरासाठी अर्ज करण्याचा निश्चय करीत ते सभागृहाबाहेर पडताना दिसत होते.
 एक लाख लोकांची ऑनलाईन निकाल पाहण्यास पसंती
यंदा ‘म्हाडा’ने सोडत ऑनलाईन पाहण्याची सोयही उपलब्ध करुन दिली होती. त्याचा फायदा घेत तब्बल एक लाख लोकांनी ऑनलाईन निकाल पाहिला. यामध्ये केवळ भारतातीलच नाही तर अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया आदी ४९ देशातील नागरिकांचा समावेश होता. यातील ६० टक्के लोकांनी मोबाईलवर निकाल पाहणे पसंत केले. त्यात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के होते.
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण
मला घर मिळाले याचा मला खूप आनंद झाला आहे. सध्या आम्ही चाळीत राहात आहोत. तेही आमचेच घर असले तरी मुंबईमध्ये माझे हक्काचे घर असावे, अशी माझी इच्छा होती आणि ‘म्हाडा’ने ती पूर्ण केली. प्रतिक्षानगरमध्येच मला घर हवे होते. पण तिथे कलाकार कोटय़ामध्ये एकच घर होते. त्यामुळे मी शासंक होतो. पण ते घर माझ्या नशीबात होते. आज सकाळीच एका कामासाठी मी बँकॉकला आलो आणि विमानातून उतरताच मला ही बातमी कळली. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे.
– प्रथमेश परब, अभिनेता

प्रवासाचा वेळ वाचला
मी मुळची ठाण्याची, पण लग्नानंतर अंबरनाथला रहायला गेले. रोजच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने सोयीचे म्हणून कांदिवलीमध्ये भाडय़ाच्या घरात राहात होतो. पण आता मुलुंडमध्ये घर लागले आहे. यामुळे मी कुटुंबाच्या अधिक जवळ येईन आणि प्रवासाचा वेळही वाचेल. गेली कित्येक वर्ष ‘म्हाडा’च्या सोडतीत नाव नोंदविण्याची इच्छा होती. पण ऐनवेळी अनामत रक्कम कमी पडायची. यंदा मात्र रक्कम जुळवून पहिल्यांदाच नाव नोंदविले. मुंबईत आपले घर असण्याचे सुख वेगळेच असते.
विशाखा सुभेदार, अभिनेत्री