वांद्रे निवडणुकांमुळे एक आठवडा पुढे ढकलली गेलेली म्हाडाच्या घरांची जाहिरात आज, सोमवारी प्रसिद्ध होत आहे. यावेळी म्हाडाकडून मुंबईत ९९७ घरे उपलब्ध झाली असून विविध आरक्षणाखालील घरे वगळता सर्वसामान्य लोकांना ४९८ घरांवर हक्क सांगता येईल. यावेळी अंध व शारीरिकदृष्टय़ा अपंगासाठीही ६६ घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व घरांसाठी १५ एप्रिलला दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून यावेळी ९९७ सदनिका उपलब्ध होणार असून अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी ११०, अनुसूचित जमातींसाठी ६०, भटक्या जमातींसाठी १५, विमुक्त जमातींसाठी १५, पत्रकारांसाठी २५, स्वातंत्र्यसैनिकांसाठी २५, अंध व शारीरिक अपंगांसाठी ३०, शहीदांचे कुटुंबीय व अपंग सैनिकांसाठी २०, माजी सैनिकांसाठी ५०, लोकप्रतिनिधींसाठी २०, म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी २०, राज्य कर्मचाऱ्यांसाठी ५०, शासकीय निवासस्थानी राहणाऱ्या व पुढील तीन वर्षांत निवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २०, कलाकारांसाठी २०, शासन स्वेच्छा निर्णयाखालील १९ घरे ठेवण्यात आली आहेत. मासिक उत्पन्नाची मर्यादा अत्यल्प उत्पन्न गटासाठी १६ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी ४० हजार रुपये आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ७० हजार रुपये ठेवली आहे.    अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ मे रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे. अनामत रक्कम ऑनलाइन न भरणाऱ्यांकडून २० मे पर्यंत बँकेच्या वेळेत डीडी स्वीकारले जातील. ८ लाख ९३ हजारापासून ते ६७ लाख ५७ हजार (अपंग उच्च उत्पन्न गट) रुपये या किंमतीदरम्यान असलेल्या या घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात येईल.

उपलब्ध घरे
*प्रतीक्षानगर – मध्यम उत्पन्न गट – ५६
*मानखूर्द – अल्प उत्पन्न गट – ६६
*गवाणपाडा, मुलुंड – मध्यम उत्पन्न गट – १८५
*गवाणपाडा, मुलुंड – अल्प उत्पन्न गट – १८२
*मालवणी, मालाड – अत्यल्प उत्पन्न गट – २३२
*उन्नतनगर, गोरेगाव – अल्प उत्पन्न गट – १८२
*उन्नतनगर, गोरेगाव – अत्यल्प उत्पन्न गट झ्र् ९४