म्हाडातर्फे २१७ सदनिकांची सोडत रविवारी पार पडली. यावेळी बहुतांश अर्जदारांनी सोडतीची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावरून घेणे पसंत केले. त्यामुळे ६६ हजारांवर अर्जदार असले तरी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात तुरळक गर्दी दिसली.

अल्प उत्पन्न गटातील १७०, मध्यम उत्पन्न गटातील ४७ सदनिकांच्या सोडतीत राशी कांबळे पहिल्या विजेत्या ठरल्या. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार, म्हाडाचे सभापती मधु चव्हाण, आमदार विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, आणि म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी-उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

अल्प उत्पन्न गटातील १७० सदनिकांसाठी ५३ हजार ४५५ तर मध्यम उत्पन्न गटातील ४७ सदनिकांसाठी १२ हजार ६३६ अर्ज म्हाडाकडे आले होते.

या सोडतीत गणेश खरनार आणि प्रशांत गायकवाड या दोन म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना गृहलाभ झाला. खरनार गेल्या अनेक वर्षांपासून सोडतीसाठी अर्ज दाखल करत असत. प्रत्येकवेळी पदरी निराशा पडली तरी पुन्हा त्याच उत्साहाने अर्ज करत होतो. कधी तरी गृहलाभ होणार, मुंबईत हक्काचे घर असावे, हे स्वप्न पूर्ण होणार, असा विश्वास होता. यंदाच्या सोडतीत स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया खरनार यांनी व्यक्त केली. त्यांचे कुटुंब नाशिकला स्थायिक आहे. ते स्वत: २३ वर्षांपासून शहरात भाडय़ाच्या घरात वास्तव्य करत आहेत.

सोडतीसाठी उपस्थित अर्जदारांपैकी अनेकांच्या पदरी निराशा पडली. सोडत सुरू झाल्यापासून आम्ही अर्ज करत आहोत. यंदाही पदरी निराशाच पडली. पण जिद्द सोडलेली नाही. पुढल्या सोडतीसाठी नव्या उमेदीने अर्ज करणार, अशी प्रतिक्रिया अंधेरी येथे वास्तव्यास असलेल्या सचिन आगवणे, बॅंक कर्मचारी पल्लवी तेली आणि अन्य अर्जदारांनी व्यक्त केली.

याआधीच्या सोडतींच्या तुलनेने यंदा म्हाडा मुख्यालयात अर्जदारांची गर्दी खूपच कमी आढळली. सोडतीतील सदनिकांची संख्या कमी असल्याने आणि ऑनलाइन माहिती घेऊन विजेते ठरल्यासच म्हाडा मुख्यालय गाठण्याची पद्धत रूढ होऊ लागल्याने सोडतीसाठी अर्जदारांची संख्या रोडावल्याचे निरीक्षण म्हाडा अधिकाऱ्यांनी नोंदवले.

पुढील सोडत गिरणी कामगारांसाठी

यापुढील सोडत ३८०० सदनिकांची असून ती गिरणी कामगारांसाठी काढली जाईल, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी केली. त्यासोबत गोरेगाव मोतीलाल नगर येथील १४२ एकर जागेत म्हाडा मायक्रोसिटी उभारण्याचा विचार सुरू असून ऑगस्ट महिन्यात त्यासाठी निविदा मागवल्या जातील, १० वर्षांच्या आत म्हाडाच्या सोडतीतील सदनिका विकल्यास ती जप्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेणार, म्हाडाच्या सोडतीला आयएसओ मानांकन मिळवणार, अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.

  • अल्प उत्पन्न गटातील १७० सदनिकांसाठी ५३ हजार ४५५ तर मध्यम उत्पन्न गटातील ४७ सदनिकांसाठी १२ हजार ६३६ अर्ज म्हाडाकडे आले होते.