मुंबई व कोकण येथील २६४१ घरांसाठी म्हाडाकडून वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज, बुधवारी लॉटरीची सोडत सकाळी दहा वाजल्यापासून काढण्यात येणार आहे. या घरांसाठी ९३,१३० अर्जदार पात्र ठरले आहेत. मुंबई मंडळाकडून शहरातील विविध भागात बांधण्यात आलेली ८१४ घरे तसेच कोकण मंडळाकडून विरार-बोळींज येथील १७१६ व वेंगुर्ला येथील १११ घरांसाठी काढली जाणारी संगणकीय सोडत पाहण्यासाठी रंगशारदा सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. सोडतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्जाच्या मूळ पावतीवर सकाळी आठ ते दहा या वेळेत एक प्रवेशिका दिली जाईल. सभागृहाबाहेरील सूचना फलकावरही सोडतीचा निकाल पाहता येईल. त्याचसोबत इंटरनेटवर लाइव्ह चित्रण पाहण्याची व्यवस्थाही यावर्षीपासून करण्यात आली आहे. मुंबई मंडळाच्या घरांची सोडत पहिल्या सत्रात व कोकण मंडळांच्या घरांची सोडत दुसऱ्या सत्रात काढली जाईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:02 pm