गिरणी कामगारांसाठीही दहा हजार घरांची निर्मिती; झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत कार्यवाही सुरू

सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळामार्फत (म्हाडा) शहर व उपनगरात येत्या तीन वर्षांत १२ हजार घरे उभारली जाणार आहेत. यंदाच्या वर्षांत सामान्यांसाठी २७२६ घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाने २०२० पर्यंत ही घरे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय गिरणी कामगारांसाठी तीन वर्षांत दहा हजार घरांची निर्मितीही म्हाडाकडून केली जाणार आहे. म्हाडा वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रस्तावांना चालना देऊन दीड ते दोन लाख घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मात्र हे सर्व तूर्तास तरी कागदोपत्री आहे.

म्हाडामार्फत २००९ पर्यंत दोन लाख २,९६४ घरांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर २०१२ ते २०१६ पर्यंत म्हाडा घरनिर्मितीचा वेग मंदावला होता. यंदाच्या वर्षांत अडीच हजारहून अधिक घरांची विक्री म्हाडामार्फत केली जाणार आहे. २०२० पर्यंत तब्बल १२ हजार घरे सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. ही घरे सामान्यांना त्यांच्या वेतनमर्यादेनुसार परवडणारी आहेत का, हा वादाचा मुद्दा असला तरी या घरांच्या किमती खासगी विकासकापेक्षा निश्चितच स्वस्त आहेत, असा विश्वास मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी व्यक्त  केला आहे. म्हाडामार्फत अधिकाधिक परवडणारी घरे उभारून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी २०२० पर्यंत १० हजार ३९७ घरांची निर्मितीही केली जाणार आहे. येत्या तीन वर्षांत तब्बल २५ हजार घरांची निर्मिती म्हाडाकडून केली जाणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी म्हाडा घरांची अधिकाधिक निर्मिती व्हावी, यासाठी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. म्हाडाच्या अखत्यारित येणाऱ्या भूखंडांची नव्याने यादीही तयार केली जात आहे. याशिवाय म्हाडा भूखंडावर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तब्बल ५०हून अधिक म्हाडा भूखंडांवर झोपडपट्टय़ा आहेत. हे भूखंड विकसित करून त्यातूनही सामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून विक्रीसाठी मिळणारी घरे दर्जेदार असून ती उत्तुंग इमारतीत आहेत, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.

परवडणारी अधिकाधिक घरे निर्माण व्हावीत यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. त्यासाठी उपलब्ध भूखंडांवर घरांची निर्मिती तसेच म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तातडीने मार्गी लागावा, यासाठी खास कक्षही उभारण्यात आले आहेत. त्यातून निश्चितच अधिकाधिक दर्जेदार घरे निर्माण होतील. – मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा.