‘मास्टर लिस्ट’मध्ये पाच नावांचा अनधिकृत समावेश

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

जुन्या इमारतीतील रहिवाशांसाठी जारी करण्यात आलेल्या ‘मास्टर लिस्ट’मध्ये अनधिकृतरीत्या पाच नावांचा समावेश करण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या आदेशात फेरफार करण्याची हिंमत दाखविणारे इमारत व दुरुस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडा उपाध्यक्षांनी दिले आहेत.

संक्रमण शिबिरात अनेक वर्षे खितपत पडलेल्या जुन्या इमारतींमधील ९५ रहिवाशांना एका फटक्यात हक्काची घरे देण्याचे ‘मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळा‘ने ठरविले होते. म्हाडा अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीमुळे जुन्या इमारतीत खितपत पडलेल्या अनेक रहिवाशांना त्यामुळे आशेचा किरण दिसू लागला होता. या रहिवाशांची ‘मास्टर लिस्ट‘ अद्ययावत करून ती संकेतस्थळावर टाकण्यात आली. ही यादी ९५ ऐवजी १०० कशी झाली, याची चौकशी करताना मुख्य अधिकारी लोखंडे यांच्या लक्षात हा घोटाळा आला.  अधिक चौकशीत या यादीत सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी आणखी पाच नावांचा समावेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या आदेशातच फेरफार करण्यात आल्याची बाब लक्षात आणून देताच म्हैसकर यांनी ही पाचही प्रकरणे रद्द केली. या काळात एका तासांत १६ प्रकरणांमध्ये वितरणपत्रे वितरित करण्याचा विक्रमही उघड झाला. या प्रकरणांनाही स्थगिती देण्यात आली आहे.

काय आहे घोटाळा?

‘मास्टर लिस्ट‘मधील ९५ रहिवाशांना घरे देण्याच्या नस्तीवर म्हाडा उपाध्यक्षांनी मंजुरी दिली. त्यानंतर सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी, याबाबतच्या टिपण्णीत एक ओळ नव्याने लिहून ‘कमी क्षेत्रफळ मिळालेली पाच प्रकरणे’ असा उल्लेख केला. या प्रकरणी वितरण पत्रेही विक्रमी वेळेत जारी केली. प्रत्येक रहिवाशाला ३०० चौरस फुटाचे घर दिले जाते. कमी क्षेत्रफळ असल्यास त्याला त्याची भरपाई म्हणून आणखी एक घर दिले जाते आणि अतिरिक्त क्षेत्रफळाबाबत बाजारभावानुसार दर आकारला जातो. या प्रकरणात गोटे यांनी आधीच घरे मिळालेल्या पाचजणांचा समावेश करून कमी क्षेत्रफळाची भरपाई करण्याच्या नावाखाली अतिरिक्त क्षेत्रफळ मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

गोटे यांनी समाविष्ट  केलेली प्रकरणे

कलावती कुडक्याल, कैसर सय्यद, लक्ष्मीबाई वेमूल, हिराबाई कदम, प्रकाश शिंदे आणि सुधीर साठे.

जुन्या रहिवाशांच्या ‘मास्टर लिस्ट’मध्ये अनधिकृतपणे पाच नावांचा समाविष्ट केल्याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल. सहमुख्य अधिकारी गोटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे 

 मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा