मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून दैनंदिन कामे करण्यास ‘म्हाडा’तील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या स्वयंघोषित आचारसंहितेचा समाचार घेऊन त्यांनी या काळात कुठली कामे करावीत वा कुठली करू नये, याबाबत मार्गदर्शकपत्र जारी करण्याची मागणी मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी केली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. म्हाडा अधिकाऱ्यांनी क्षुल्लक कामे करण्यासही नकार दिल्यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे करण्यात आल्यानंतर याबाबत आपण म्हाडा उपाध्यक्षांना परिपत्रक जारी करण्याची मागणी केली आहे.

म्हाडा अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून घेतला आहे. पूर्वी मंजूर झालेली विकास कामे तसेच काही रहिवाशांच्या मंजूर पत्रांबाबतही हे अधिकारी आचारसंहितेचे कारण पुढे करीत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसत आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

राजकीय पक्ष, त्यांचे निवडणूक काळातील कार्यक्रम, उमेदवार आणि त्यांचा प्रचार यासाठी आचारसंहिता लागू आहे. कोणत्याही नवीन कामाची पायाभरणी, सुरुवात किंवा घोषणा करायची नसते वा नव्या कामांचे उद्घाटन करायचे नसते.

याव्यतिरिक्त ज्याबाबत अगोदरच धोरण ठरलेले आहे किंवा आचारसंहितेपूर्वी सुरुवात झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास हरकत नसते, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले की, त्यामुळेच निवडणूक आचारसंहितेच्या काळात म्हाडा अधिकाऱ्यांनी कोणती कामे करावीत वा कोणती करू नये, याबाबत परिपत्रक जारी करण्याची आवश्यकता आहे.