News Flash

म्हाडावासीयांच्या हक्काच्या दीडशे चौरस फुटांवर गदा

गेली चार-पाच वर्षे रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी प्राधिकरणाने अभिन्यास मंजूर नसतानाही ७० टक्के चटई क्षेत्रफळाचे वितरण करण्यास परवानगी दिली.

| August 12, 2013 01:17 am

गेली चार-पाच वर्षे रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी प्राधिकरणाने अभिन्यास मंजूर नसतानाही ७० टक्के चटई क्षेत्रफळाचे वितरण करण्यास परवानगी दिली. त्यामुळे अर्धवट इमारती पूर्ण करण्यातील अडसर दूर झाला. नगरविकास खात्याने मात्र सुधारित नियमावलीत सामान्य म्हाडावासीयांच्या हक्काच्या दीडशे चौरस फुटांवर गदा आणण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४८४ चौरस फुटांच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य म्हाडावासीयाला यापुढे ३५० चौरस फुटांचीच सदनिका मिळणार आहे.
मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. या वसाहतींना शासनाने अडीच इतके चटई क्षेत्रफळ मंजूर केले तेव्हा अल्प गटाला ४८४ चौरस फुटांचे किमान घर मिळू शकेल, असे अधिसूचना काढून जाहीर केले. आता म्हाडावासीयांना तीन इतके चटई क्षेत्रफळ जाहीर केल्यानंतर अल्प गटातील रहिवाशांचे दीडशे चौरस फुटांचे हक्काचे चटई क्षेत्रफळ कमी केले. सुधारित नियमावली मंजूर झाली तर अल्प गटाला ३५० चौरस फुटांचेच घर मिळू शकणार आहे. या नियमावलीस आक्षेप घेऊन पूर्वीप्रमाणेच ४८४ चौरस फुटांचे घर मिळावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मात्र ही मागणी मान्य करू नये, असा विकासकांचा दबाव असून त्याच दिशेने नगरविकास विभागाने हालचाली सुरू केल्याचे कळते. त्यामुळे दिवाळीच्या आधी म्हाडावासीयांना नव्या सुधारित नियमावलीनुसार भेट देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरविली असले तरी म्हाडावासीयांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. अनेकांनी विकासकांसमवेत ४८४ चौरस फूट घराचा करारनामाही केला आहे. विकासकाची तयारी असल्यास त्यांना उर्वरित चटई क्षेत्रफळ मिळू शकते; परंतु त्यामुळे म्हाडाने नव्या सुधारित धोरणात तीन इतके चटई क्षेत्रफळ देऊ केले असले तरी त्या तुलनेत म्हाडाला द्यावयाच्या घरांची संख्या व प्रत्यक्ष फायदा पाहता विकासकांना सौदा परवडणे कठीण आहे.
*२००८ : गृहनिर्माण धोरण जाहीर;पण म्हाडा वसाहतींचा
उल्लेखच नाही, २.५ चटई क्षेत्रफळाची घोषणा
*२००९ : अत्यल्प, अल्प, मध्यम गटाचे क्षेत्रफळ निश्चित. अत्यल्प गटाला ३००, तर अल्प गटाला ४८४ चौरस फूट टिटबिटचा घोळ
*२०१० : प्रीमिअमऐवजी फक्त घरे घेण्याचा निर्णय
*२०१३ तीन चटई क्षेत्रफळाची घोषणा; मात्र वैयक्तिक म्हाडावासीयाच्या चटई क्षेत्रफळात कपात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:17 am

Web Title: mhada residential miss 150 sq ft home only 350 sq ft home in new regulation
Next Stories
1 आंबेडकर स्मारकासाठी रिपाइंचे १६ ऑगस्टपासून आंदोलन
2 मनसे नगरसेवकाच्या मारहाणीमुळे पालिका अभियंत्यांचे मनोबल खच्ची!
3 कल्याणमध्ये तीन स्त्री-अर्भकांची हत्या ?
Just Now!
X