म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाच्या दर्जास अनुकूलता

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दाखविल्यामुळे म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासातील महापालिकेचा अडथळा दूर होणार आहे. म्हाडा वसाहतींचे अभिन्यास (लेआऊट) मंजूर करण्यास कमालीची दिरंगाई दाखविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना ही चांगलीच चपराक आहे.

म्हाडा वसाहतींसाठी स्वतंत्र धोरण जाहीर केल्यानंतरही पुनर्विकासाचे गाडे पुढे सरकू शकलेले नव्हते. चार इतके चटई क्षेत्रफळ जाहीर करूनही कोणी विकासक प्रस्ताव घेऊन पुढे येत नव्हते. यामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी रस घेतला. म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव त्यांचाच होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दाखविल्यामुळे म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागेल, असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला आहे.

अभिन्यासाला मंजुरी मिळत नसल्यामुळे प्रोरेटा (अतिरिक्त) चटई क्षेत्रफळ वापर करता येत नसल्यामुळे म्हाडाचा पुनर्विकास रखडला होता. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर पवई येथे अभिन्यास मंजुरीसाठी विशेष कक्ष स्थापना करण्यात आला; परंतु तरीही अभिन्यास मंजुरीला वेग आलेला नव्हता. परिणामी म्हाडा वसाहतींचा प्रत्यक्षात पुनर्विकास सुरू होऊ शकलेला नव्हता. अभिन्यासाला मंजुरी मिळावी, यासाठी विकासकांच्या प्रयत्नांनाही पालिकेने दाद दिली नाही. त्यामुळे रखडलेल्या पुनर्विकासातील रहिवाशांसोबत विकासकांचे खटके उडायला सुरुवात झाली होती. प्रकल्प पुढे सरकत नसल्यामुळे विकासकही हतबल झाले होते. मात्र आता म्हाडालाच विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचे निश्चित झाल्यामुळे या विकासकांमध्ये आता पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. म्हाडाचे सर्व अभिन्यास तातडीने मंजूर झाले तर पुनर्विकासाला निश्चितच वेग येईल, असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार निखिल दीक्षित यांनी व्यक्त केले.

म्हाडाकडून आतापर्यंत पुनर्विकास प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जात होते. विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यावर म्हाडाच्या पातळीवरच आराखडे मंजूर होतील आणि म्हाडा पुनर्विकासाचा वेग वाढून मोठय़ा प्रमाणात घरांचा साठा निर्माण होईल.  – मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा