‘म्हाडा’शी संबंधित विविध सेवांची हमी देणारी खास यंत्रणा सुरू करण्यात आली असून तूर्तास ‘म्हाडा’तील दहा सेवा ठरावीक कालावधीत लोकांना हमखास मिळणार आहेत. या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सेवावेळेत आणि योग्य पद्धतीने देण्याचे बंधन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहणार आहे. लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे ‘म्हाडा’ ही पहिली शासकीय संस्था ठरली आहे. या कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्याने विहित कालावधीत सेवा न दिल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
या यंत्रणेचे उद्घाटन गुरुवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते झाले. या सेवेमुळे आता नागरिकांना आपले काम ठरावीक वेळेत होण्याची हमी मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या सर्व विभागीय मंडळांमध्ये स्वतंत्र कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून प्रत्येक कामासाठी कालमर्यादा ठेवण्यात आली आहे.

या सुविधांची वेळेत हमी..
* निवासी वा अनिवासी सदनिका/ भूखंड भोगवटा (हस्तांतरण)
* निवासी वा अनिवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण
* थकबाकीबाबत ना देय प्रमाणपत्र
*  तारण ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र
* सदनिका/ व्यापारी गाळा विक्री परवानगी
* भूखंड विक्री परवानगी
* खरेदी किंमत वा कर्ज थकबाकी भरणापत्र
* सदनिकेचा उर्वरित भाडेखरेदी हप्ता वा भरणा पत्र
*  नस्तीतील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती
*  सदनिका भाडेतत्त्वावर देण्यास ना हरकत प्रमाणपत्र