मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्ने पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पुढील वर्षी १५०० घरे उपलब्ध करण्याचा संकल्प ‘म्हाडा’ने रविवारी १०६३ घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करताना सोडला. पुढील वर्षीच्या सोडतीमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर कोकण विभागातील विरार-बोळिंज भागामधील ४७०६ घरांसाठी डिसेंबर २०१५ मध्ये सोडत जाहीर केली जाणार आहे.
वांद्रे येथील रंगशारदामध्ये रविवारी ‘म्हाडा’च्या घरांची सोडत काढण्यात आली. मुंबईमधील १०६३ घरांचा यामध्ये समावेश होता. लोकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यंदाच्या तुलनेत पुढील वर्षी दीडपट अधिक घरे म्हाडातर्फे उपलब्ध करण्यात येतील. पुढील वर्षी साधारणपणे १,५०० घरांची  सोडत काढण्याचा ‘म्हाडा’चा मानस आहे, असे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संभाजी झेंडे सांगितले. मुंबईमधील घरांची सोडत मार्च २०१६ मध्ये काढण्यात येणार असून, यामध्ये मुलुंड, बोरिवली, पवई येथील घरांचा समावेश असेल. उच्च उत्पन्न गटाकडे खासगी क्षेत्रातील घरांचा पर्याय असतो, पण ही घरे कमी उत्पन्न गटाला परवडणारी नसतात. त्यामुळे यापुढे या दोन उत्पन्न गटाला घरे उपलब्ध करून देण्याकडे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती खाजगी क्षेत्रातील घरांच्या किमतीइतक्याच असल्याची ओरड होती. त्याविषयी झेंडे म्हणाले की, घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण इमारतींचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे होते. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्यावर मर्यादा आली. तसेच यापुढे अर्जदारांची पात्रता प्रक्रिया वेगात पूर्ण करून ग्राहकांना शक्य तितक्या लवकर घराचा ताबा देण्याचे ‘म्हाडा’चे उद्दिष्ट आहे.

स्वप्नपूर्तीचा आनंद
मुंबापुरीमध्ये हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी दरवर्षी निघणारी ‘म्हाडा’च्या घरांची सोडत एक आशेचा किरण ठरते. त्यामुळे रविवारी ‘म्हाडा’च्या सोडतीचा निकाल पाहण्यासाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर सकाळी ९ वाजल्यापासून अर्जदारांनी तोबा गर्दी केली होती.