बीडीडी चाळ : भाडेकरूंमधील वाद, पक्षीय राजकारण कारणीभूत?

मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्पातून एल अँड टीने माघार घेतल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असताना ना. म. जोशी मार्ग प्रकल्पात रहिवाशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी म्हाडाने पुनर्वसनाच्या इमारती तयार नसतानाही या घरांसाठी बुधवारी जारी केलेली सोडत पुढे ढकलली आहे. नेमके कारण कळू शकलेले नसले तरी भाडेकरूंमधील मतभेद व पक्षीय राजकारण कारणीभूत असल्याचे कळते. मुळात अशी सोडत जारी करण्याची आवश्यकता नसतानाही ती करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत दोन हजार ५६० रहिवासी असून आतापर्यंत दहा चाळींतील ८०० भाडेकरूंचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ६०७ भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत. संक्रमण सदनिकेत स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी  ३१४ भाडेकरूंशी जागेवरच करारनामा पंजीकृत करून घेतला असून यापैकी २७२ भाडेकरू संक्रमण सदनिकेत स्थलांतरित झाले आहेत. या २७२ भाडेकरूंना पुनर्वसनाच्या इमारतीतील १६ ते २२ मजल्यांवरील सदनिका वितरित करण्यात येणार आहेत. या पुनर्वसनाच्या इमारतींचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. मात्र त्यांना वितरणपत्र देऊन त्यांच्याशी करार करण्यात येणार आहे.

ना. म. जोशी मार्ग येथे ३२ चाळी आहेत. तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा चाळी पाडल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या इमारती बांधल्या जाणार आहेत. सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. साडेतीन वर्षांत फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. शापुरजी पालनजी समूह या प्रकल्पाचे कंत्राटदार आहेत. नायगाव बीडीडी चाळीत काही मूठभर स्थानिकांच्या विरोधामुळे या प्रकल्पातील कंत्राटदार असलेल्या एल अँड टीने माघार घेतली. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतही हे लोण काही प्रमाणात पोहोचले आहे. अशा वेळी आता हवेतील घरांची खात्री देऊन म्हाडाने भाडेकरूंमध्ये विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. पण न झालेल्या या घरांची सोडत कशाला हवी, असा प्रश्न उपस्थित केला गेल्याने अखेर म्हाडाला ही सोडतही पुढे ढकलावी लागली आहे.