कोकण विभागासाठी १८ जुलैपासून अर्ज नोंदणी; १९ ऑगस्ट रोजी संगणकीय निकाल

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत परवडणाऱ्या अशा ९०१८ सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणी १८ जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३९३७ घरांचा समावेश आहे. १९ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत होईल.

अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी ही सोडत आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सन २०१७—२०१८ या आर्थिक वर्षांतील अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपयांपर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता ही मर्यादा  २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता  ५० ते ७५ हजार रुपयांपर्यंत असणार आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न  ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला(सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटाकरिता  ५,४४८ रुपये, अल्प उत्पन्न गटाकरिता १०,४४८ रुपये, मध्यम उत्पन्न गटाकरिता १५,४४८ रुपये, उच्च उत्पन्न  गटाकरिता २०,४४८ रुपये प्रति अर्ज असून यामध्ये ऑनलाईन अर्जाचे ४४८ रुपये शुल्काचा समावेश आहे.

सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. अर्जदारांच्या नोंदणीची मुदत १८ जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १९ जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९  वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. कोकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी आणि आरटीजीएस पद्धतीने अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचबरोबर  डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नसल्याचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३९३७ सदनिका

सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५, खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.