आगीत भस्मसात झालेल्या इमारतीतील कुटुंबांची दैना; म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरांत घुसखोरांचा मुक्काम

नेहमीप्रमाणे रहिवाशी रात्री ९च्या सुमारास पाणी भरण्यात मग्न होते.. अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला.. एकच धावपळ उडाली आणि रहिवाशांनी इमारतीतून पळ काढला. इमारतीचे छप्पर आणि काही खोल्या आगीत भस्मसात झाल्या. अनेक संसार रस्त्यावर आले. मोठय़ा मिन्नतवारीनंतर म्हाडाने संक्रमण शिबिरात पर्यायी घर दिले. पण काही घरांमध्ये घुसखोर, तर काही खोल्यांना टाळे (सील) ठोकलेले. दुर्घटनेनंतर काही दिवस इमारतीबाहेरच पदपदावर मुक्काम ठोकलेल्या रहिवाशांना अखेर आगीत भस्मसात झालेल्या घराचा आसरा घ्यावा लागला आहे.

भायखळा परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाजवळील (राणीची बाग) दादोजी कोंडदेव मार्गावरील पालनजी रतनजी चाळीमध्ये तब्बल ७८ कुटुंबे वास्तव्याला आहेत. या शंभर वर्षे जुन्या दुमजली इमारतीला ९ मे रोजी रात्री ९ वाजता अचानक आग लागली. स्थानिकांनी इमारतीतील सर्व कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री एक वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण आणले. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र चाळीतील ७८ रहिवाशांचे संसार रस्त्यावर आले. १२ खोल्यांवरील छप्पर आगीत जळून खाक झाले, तर काही खोल्यामधील सामान बेचिराख झाले. अवघी रात्र रस्त्यावरच बसून काढलेल्या रहिवाशांनी दुसऱ्या दिवशी धीर करून आपल्या घराची पाहणी केली. आगीतून वाचलेले सामान घेऊन रहिवाशी रस्त्यावर आले. मात्र कोणतीच शासकीय यंत्रणा या रहिवाशांच्या मदतीला धावली नाही हे विशेष.

रहिवाशांनी म्हाडाकडे धाव घेत पर्यायी घर मिळावी यासाठी अनेक वेळा मिन्नतवाऱ्या केल्या. त्यानंतर म्हाडाने बोरिवलीमधील गोराई परिसरातील संक्रमण शिबिरातील जागा देऊ केल्या. मात्र मुलांच्या शाळा, व्यवसाय, नोकरी आदींचे प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे लक्षात घेऊन रहिवाशांनी भायखळ्याच्या आसपासच्या संक्रमण शिबिरात जागा मिळावी अशी विनंती केली. घर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत अधिकाऱ्यांनी ही विनंती धुडकावली. म्हाडाकडून लवकर घर मिळण्याची अपेक्षा मावळू लागल्याने एकेका कुटुंबाने इमारतीमधील घरात साफसफाई सुरू केली. पण ७८ पैकी १२ खोल्या राहण्यायोग्य नाहीत. मात्र छप्पर नसलेल्या खोल्यांमध्ये रहिवाशांना आपला कुटुंबकबिला हलवावा लागला. काहींनी गॅलरीचा आसरा घेतला आहे.

रहिवाशांनी सातत्याने मागणी केल्यानंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी परळमधील त्रिशूळ, करी रोडमधील साफल्य, मातृछाया, डोंगरीमधील हनुमाननगर येथील संक्रमण शिबिरातील काही सदनिकांच्या चाव्या दिल्या. घराची पाहणी करायला गेल्यानंतर तेथे भलतेच कुणी तरी वास्तव्य करीत असल्याचे आढळले. तर काही खोल्या राहण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास आले, अशी व्यथा रहिवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. ही बाब म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मात्र अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.

त्यामुळे संक्रमण शिबिरातील सदनिका मिळूनही काही उपयोग झाला नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. अखेर रहिवाशांना आग लागलेल्या इमारतीमधील छप्पर नसलेल्या घरातच आसरा घ्यावा लागला आहे. पावसाळा जवळ येत आहे. त्यामुळे छप्पर नसलेल्या घरात कसा टिकाव लागणार अशा विवंचनेत रहिवाशी आहेत. पण त्याचे सोयरसुतक ना लोकप्रतिनिधींना ना शासकीय यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना.

आगीत घर भस्मसात झालेल्या नऊ रहिवाशांना म्हाडाकडून संक्रमण शिबिरामध्ये घर देण्यात आले होते. मात्र त्यापैकी तीन घरांमध्ये घुसखोर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रहिवाशांना धारावी अथवा गोराई येथील संक्रमण शिबिरातील घर देण्यास म्हाडा तयार आहे. अन्य रहिवाशांना दिलेले घर राहण्यायोग्य नसल्याची तक्रार ते करीत आहेत. मात्र आसपासच्या परिसरात संक्रमण शिबिरात जागा उपलब्ध नसल्याने रहिवाशांना तडजोड करावी लागेल.

विशाल देशमुख, उपप्रमुख अधिकारी, म्हाडा