‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरांत निम्याहून अधिक घुसखोरच शिरले असल्याच्या पाश्र्वभूमीवर यापुढे मुंबईत एकही संक्रमण शिबीर न बांधण्याचा निर्णय ‘म्हाडा’ने सोमवारी घेतला. त्याचवेळी कांदिवलीत २७० घरांचा संक्रमण शिबिराचा प्रस्ताव रद्द करत त्याऐवजी या ठिकाणी बांधण्यात येणारी २७० घरे रास्त दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचेही ठरवण्यात आले आहे.
‘म्हाडा’ची मुंबईत शहर व उपनगरात संक्रमण शिबिरे असून त्यात तब्बल १८,३५४ गाळे आहेत. या संक्रमण शिबिरात पात्र रहिवाशांपेक्षा घुसखोरांचीच गर्दी जास्त आहे. पात्र रहिवाशांना नव्याने उपलब्ध होणाऱ्या मालकीचे घर देण्यासाठी यादी तयार करण्याचे काम ‘म्हाडा’ने हाती घेतले होते. त्यावेळी सर्वाना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण १८,३५४ गाळे पूर्णपणे भरलेले असताना केवळ साडे सात हजार अर्ज आले. त्यामुळे संक्रमण शिबिरात ११ हजाराहून अधिक घुसखोर असल्याचे चित्र समोर आले. इतक्या मोठय़ा प्रमाणात घुसखोर असल्याने संक्रमण शिबिरांचा उपयोग हा वादाच्या भोवऱ्यात सापडला.
या पाश्र्वभूमीवर ‘म्हाडा’च्या विभागप्रमुखांची बैठक सोमवारी झाली. यात कांदिवलीमधील महावीर नगर येथे २७० घरांचे संक्रमण शिबीर बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी प्राधिकरणाकडे पुरेशी संक्रमण शिबिरे असल्याने आता यापुढे नव्याने संक्रमण शिबीर बांधू नये. त्याऐवजी अशा जागांवर सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची बांधणी करावी, असा आदेश दिला. त्यानुसार आता ‘म्हाडा’ने संक्रमण शिबिरांच्या बांधकामावर फुली मारली आहे.
त्याचबरोबर गोरेगाव येथील ‘म्हाडा’ची संक्रमण शिबीर असून सुमारे एक हजार घरे आहेत. या ठिकाणी पुनर्विकास केल्यास सध्याच्या रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर सर्वसामान्यांसाठी मोठय़ाप्रमाणात घरे उपलब्ध होतील असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर या प्रस्तावाचा अभ्यास करावा, असा आदेश गवई यांनी दिला.
७ ऑक्टोबरला २५०० घरांची पायाभरणी
‘म्हाडा’तर्फे मुंबईबरोबरच पुणे, नागपूर येथेही घरांच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सात ऑक्टोबरला जागतिक अधिवास दिन आहे. ते औचित्य साधून या दिवशी या सर्व ठिकाणी एकूण २५०० घरे बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.