वर्षभरापूर्वी झालेल्या एका खुनाची उकल करण्यात ‘एमआयडीसी’ पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. १६ मे २०१२ रोजी एका व्यक्तीची हत्या करून मृतदेह कांजुरमार्ग येथे एका गटारात टाकून देण्यात आला होता. मृताच्या डोक्यावर जखमांचे वार होते. मृताचे नाव शिवानंद पुजारी (३४) असे होते. या खुनाची उकल करणे हे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते. ‘एमआयडीसी’ पोलीस ठाण्यात या दरम्यान एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची एक तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून अखेर या हत्येची उकल केली. या प्रकरणी बबलू सिंह (३३), सुशील ऊर्फ दुगऱ्या कुरडे (२७), रियाझ अन्सारी (३४) यांना अटक करण्यात आली आहे. मयत शिवानंद आणि हे तिघे आरोपी एकमेकांना ओळखत होते. शिवानंद हा दारुडय़ा तसेच भुरटा चोर होता. बबलू व सुशील बसचालक म्हणून तर रियाझ रिक्षाचालक म्हणून काम करत असत. १२ मे रोजी रोजी शिवानंदसह आरोपींनी एकत्र मद्यपान केले. या वेळी अचानक शिवानंद आणि आरोपींमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर शिवानंदला ते तिघे पूर्व द्रुतगती महामार्गावर घेऊन गेले आणि त्याला मारून त्यांनी त्याचा मृतदेह गटारात फेकून दिला होता. या खुनाचा छडा लावण्यात पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि अन्य पोलिसांची मदत झाली.