|| शैलजा तिवले

३१ ते ४० वयोगटातील करोनाबाधितांची संख्या ज्येष्ठांपेक्षाही जास्त; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विश्लेषणात्मक अहवालातून निर्दशनास

मुंबई : करोना विषाणूचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांखालील मुलांना असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत असले तरी, महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या विश्लेषणात काहीसे वेगळेच चित्र समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या १२२ रुग्णांमध्ये ३१ ते ४० या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या १३ टक्के  आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरूवारी जाहीर केलेल्या विश्लेषणात्मक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात गुरुवापर्यंत नोंदवण्यात आलेल्या करोनाबाधित रुग्णांचा अभ्यास केला.  राज्यात १२२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्याखालोखाल केरळमध्ये १०९ रुग्ण नोंदले आहेत. यांपैकी ६९ टक्के पुरूष तर ३१ टक्के महिला आहेत. वयोगटानुसार ३१ ते ४० या वयोगटातील रुग्णांची संख्या ३३ इतकी आहे. ६१ ते ८० वयातील १६ रुग्णांचा समावेश आहे. दहा वर्षांपर्यंतच्या रुग्णांची संख्या दोन इतकी आहे. एकूण करोनाबाधितांपैकी ५४ टक्के रुग्ण हे परदेशातून प्रवास करून आले आहेत. यांच्या संपर्कात आल्याने ३१ टक्के रुग्णांना संसर्गाची बाधा झाली आहे. ६ टक्के रुग्णांना कशामुळे संसर्ग झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, तर ११ टक्के जणांमध्ये संसर्गाची कारणे शोधण्याचे काम अजून सुरू आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

परदेशातून आलेल्या आणि संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये २५ हून अधिक रुग्ण हे आखाती देशातून प्रवास करून आले आहेत. त्याखालोखाल अमेरिका, ब्रिटन, फिलिपाइन्स, सौदी या देशातून आलेले रुग्णांची अधिक नोंद झाल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत (५६) असून त्याखालोखाल पुणे, पिंपरी, सांगलीत रुग्ण आढळले आहेत. ९ मार्चला राज्यात पहिला रुग्ण आढळला गुरुवारी सतरावा दिवस होता. २१ मार्चपासून दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. २३ मार्चला एका दिवसात राज्यात २३ रुग्ण आढळले होते.

धोका नाही असे म्हणता येणार नाही..

३१ ते ४० वयोगटांतील रुग्ण अधिक प्रमाणात असले तरी यांच्यामार्फत अनेक जणांपर्यंत संसर्ग पसरविलेला असण्याची शक्यता आहे. हे संक्रमण जसजसे वाढत जाईल तसे जोखमीच्या गटात असणारे ज्येष्ठ व्यक्ती किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाचे रुग्ण यांच्यापर्यंत हा संसर्ग पसरण्याचा संभव आहे. यातून पुढील काळात मृत्यूची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी व्यक्त केले.

परदेश प्रवास के लेले रुग्ण –     ६६

रुग्णांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले रुग्ण –        ३५

संसर्गाचे कारण अस्पष्ट असलेले रुग्ण-   ७

संसर्गाचे कारणांचा  शोध सुरू असलेले  रुग्ण – १३