News Flash

स्थलांतरित मजूर अजूनही वाऱ्यावर

अपंग, महिला, वृद्धांचाही समावेश

संग्रहित छायाचित्र

अमर सदाशिव शैला/निलेश अडसूळ

टाळेबंदीनंतर अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने निवाऱ्याची सोय केली असली त्याची माहिती या मजुरांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागत आहेत. घरी जाण्यासाठी वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फुटपाथवर घरोबा केला आहे.

टाळेबंदीमुळे अचानक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने अडकलेले मजूर घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतील मजूरही दादर स्थानकात मागील दहा दिवसांपासून अडकून पडले आहेत. खानदेशच्या ६० वर्षीय प्रमिला जाधव १८ मार्चपासून दादर पूर्वेच्या पदपथावर बसून आहेत. पाडव्याच्या निमित्ताने कडुलिंबाचा पाला विकण्यासाठी आलेल्या प्रमिला सांगतात, ‘पाला विकून आलेले सगळे पैसे आता संपत आले आहेत. वयानुसार जास्त धावपळ होत नाही, मात्र पोलीस हाकलवून लावत असल्याने दिवसभर फिरत राहावे लागते.’ हीच अवस्था इथल्या प्रत्येक मजुराची आहे.

औरंगाबादचा २७ वर्षीय दिलीप पवार ऊसतोड कामगार आहे. सुरतहून ऊसतोडणी करून औरंगाबादला निघालेला दिलीप दादपर्यंत आला. मात्र वाहतूक बंद झाल्याने पुढे जाऊ शकला नाही. तो अपंग असून या परिस्थितीचा त्याला अधिक त्रास होत आहे, तर उत्तर प्रदेशचा ३२ वर्षीय जीयुत गुप्ता सांगतो, ‘मुंबईत मी कढियाच्या हाताखाली काम करतो. आमचा कंत्राटदार गावी गेल्याने आता कुठे राहायचे, असा प्रश्न आहे.  तेवीस वर्षीय अनिल गुप्ता कामासाठी १७ मार्चला उत्तर प्रदेशहून मुंबईत आला. त्याला करोनाविषयी काहीच माहिती नव्हती आणि १८ मार्चला मुंबईतील परिस्थिती पाहून तो अधिकच घाबरून गेला. अमर सिंग हे ६५ वर्षीय असून कामाच्या शोधात दिल्लीवरून मुंबईला आले होते.  टाळेबंदी झाल्याने ते अडकून पडले आहेत.  दादर स्थानकाबाहेरील दोन्ही बाजूला अकोला, अमरावतीसह छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशील लोक अडकले आहेत. संस्थांकडून मिळणाऱ्या अन्नावर यांची गुजराण होत आहे.

केईएम रुग्णालयाबाहेरील रुग्ण पदपथावर

मुंबईत उपचारासाठी आलेले रुग्ण वाहतूकबंदीमुळे रस्त्यावर राहत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या १ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते; परंतु याबाबत अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. आपल्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन चव्हाण दाम्पत्य गेले दहा दिवस रुग्णालयाच्या पदपथावर दिवस काढत आहे. त्यांच्या मुलीला अप्लास्टिक अनेमिया झाल्याने दिवसातून काही तास तिच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत असतो. या रुग्णांमध्ये वृद्ध आणि गर्भवती महिलांचाही समावेश आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवरही उपचार केले जात असल्याने या पीडित रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बेफिकिरीचे परिणाम या रुग्णांना सहन करावे लागणार की काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:45 am

Web Title: migrant laborers still on the road abn 97
Next Stories
1 मुंबईतील आणखी चार करोनाग्रस्तांचा मृत्यू
2 शहरातील ५ रुग्णालये ‘करोना समर्पित’
3 मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांचे धारावीत वास्तव्य
Just Now!
X