मूळ गावी परतण्यासाठी दाटीवाटीने प्रवास

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : परराज्यातील आपले गाव गाठण्यासाठी ठाणे, इगतपुरी भागातून उत्तरेकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या रविवारी लक्षणीयरीत्या कमी झाली. त्याचवेळी ट्रक, टेम्पोतून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

गेल्या चार दिवसांत मुंबई आणि महानगरातून मिळेल त्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांनी गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. रेल्वेसाठी नंबर केव्हा लागणार हे माहीत नसल्याने, तसेच खासगी बसचा महागडा प्रवास झेपत नसल्याने ठाणे-इगतपुरी मार्गावर सर्वत्र पायी चालणाऱ्या, ट्रक, टेम्पोतून जाणाऱ्या मजुरांची प्रचंड गर्दी होती. पण रविवारी पायी जाणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली. मुंबईच्या वेशीवरून महामार्गावर जाणाऱ्या नाकाबंदीत वाढ झाल्याने यास आळा बसला. तसेच इगतपुरी येथून पायी जाणारे आणि सायकलस्वार यांना थेट राज्याच्या सीमेपर्यंत मोफत एसटी सेवा शनिवारी रात्रीपासून सुरू केल्यामुळे पुढील टप्प्यावर गर्दी कमी होत गेली.

पायी चालणारे मजूर ठाणे ते भिवंडी बायपास टप्प्यात आढळून आले. या ठिकाणाहून ट्रक अथवा टेम्पोचा वापर करून जाणाऱ्यांच्या संख्येत मात्र फरक पडला नव्हता. उलट ट्रकच्या टपावर बसून प्रवास करण्याची जोखीम अनेकांनी घेतली. त्यातच वाटेतील सायकलस्वारांनी हात केल्यावर तेदेखील सायकलीसहित ट्रकच्या टपावर बसले. छोटय़ा टेम्पोतून प्रवासाचे प्रमाणदेखील वाढले होते. टेम्पोच्या हौद्यात पोटमाळ्याप्रमाणे जागा निर्माण करून दुप्पट प्रवासी भरून नेले जात होते. काही ठिकाणी कंटेनरचादेखील वापर करण्यात आला. विशेष म्हणजे ही सर्व वाहने अगदी विनासायास जिल्हा हद्द ओलांडून जात होती.

रिक्षांची संख्या वाढली :

ट्रक, टेम्पोतील प्रचंड गर्दी, प्रवासातील अनिश्चितता आणि वाढणारा खर्च टाळण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी स्वत:च्या रिक्षेनेच उत्तर प्रदेशला जायचा मार्ग पत्करला. कुटुंबातील सर्व सदस्य घेऊन केवळ सहा हजार रुपयांत प्रवास करणे शक्य असल्याने त्यांनी हा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले. २२ मार्चपासून रिक्षा बंद असली तरी पार्किंगसाठी दिवसाचे चाळीस रुपये मोजावे लागतात, तसेच कर्जाचा हप्ता सुरूच आहे. त्यापेक्षा रिक्षा घेऊन थेट आपले गाव गाठणे सोयीचे असल्याचे या रिक्षाचालकांनी सांगितले. स्वत:चे वाहन असल्याने प्रवास सुखकर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बहुतांशपणे चार-पाचच्या समूहाने या रिक्षांचा प्रवास सुरू होता.

रात्री वाहनांची वर्दळ अधिक

’ रात्री ठाणे येथील तीन हात नाका ते मुंबई-आग्रा महामार्गावरील भिवंडी बायपास या सुमारे १५ किमी टप्प्यावर स्थलांतरित आणि ट्रक, टेम्पो अशा वाहनांची गेल्या आठ दिवसांपेक्षा प्रचंड मोठी रांगच लागली.

’ मुंबई आणि महानगर परिसरातून आलेले हजारो स्थलांतरित या ठिकाणी ठरलेल्या वाहनाची वाट पाहत होते. या गर्दीत के वळ मजुरच नाही तर महिला, लहान मुले यांचादेखील समावेश होता. तीन हात नाका ते माजीवडा नाका या टप्प्यातील सेवा रस्त्यावर शेकडो स्थलांतरित चालत तसेच आपल्या वाहनांची वाट पाहत होते. काही ठिकाणी स्थलांतरित ट्रकमध्ये बसत होते.

’ स्थलांतरितांना नेण्यासाठी मिळेल त्या वाहनाचा वापर होत होता. सुमारे ४० फू ट लांबीच्या खुल्या ट्रेलरला सुमारे तीन फू ट उंच आणि सुमारे १२ फू ट रुंदीचे आवरण लावून तात्पुरती व्यवस्था तयार करण्यात आली होती.

सायकलस्वारांचा प्रवास सुरूच

पायी चालणाऱ्यांची संख्या घटली असली तरी सायकलस्वार मात्र मोठय़ा संख्येने रस्त्यावर दिसत होते. मुंबईपेक्षा भिवंडी, तळोजा, पेण, पनवेल या ठिकाणाहून सायकल चालवत आलेल्या मजुरांची संख्या अधिक होती. नव्या सायकलींबरोबरच जुन्या सायकली दीड-दोन हजारात खरेदी करून जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. उत्तर प्रदेश, बिहार या दोन राज्यांबरोबरच ओडिशा, प. बंगाल आणि झारखंड येथील मजूर रविवारी अधिक होते.

स्थानिकांची मदत

ठाणे ते इगतपुरी टप्प्यात या मजुरांसाठी अनेक ठिकाणी स्थानिक मंडळे, गुरुद्वारा यांच्यामार्फत जेवण, पाणी आणि नाश्त्याची सोय करण्यात आली होती. एरवी स्थानिक-परप्रांतीय असा वाद उफाळतो, पण मजुरांच्या या प्रवासात स्थानिक मोठय़ा प्रमाणात मदत करत होते. या टप्प्यात शासकीय यंत्रणांमार्फत मदत केवळ इगतपुरी येथेच होती.