राज्य सरकार आणि बीएनएचएसमध्ये लवकरच सामंजस्य करार

सुहास जोशी, मुंबई

स्थलांतरित पक्ष्यांच्या मध्य अशियाई स्थलांतर मार्गाशी (सेंट्रल अशियायी फ्लायवे) निगडित अशा राज्यातील सहा महत्त्वाच्या पाणथळ जागांसाठी राज्याने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकार आणि बीएनएचएस यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार होईल.

स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रवासमार्गावरील देशभरातील ७७ अधिवासांचे संवर्धन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा मागील वर्षी मंजूर झाला. त्यामध्ये राज्यातील दोनच अधिवासांचा समावेश आहे.

त्या व्यतिरिक्त राज्यामध्ये स्थलांतर मार्गावरील अनेक महत्त्वाच्या पाणथळ जागा आहेत. त्या अधिवासांचा अभ्यास करणे, संवर्धनाचे आणि व्यवस्थापनाचे उपाय, क्षमता वाढविणे, प्रशिक्षण आणि देखरेखीसाठी नियमावली

या मुद्दय़ांचा अंतर्भाव असलेली योजना राज्याने काही महिन्यांपूर्वी आखली. त्याला अंतिम स्वरूप मिळाले असून लवकरच राज्य सरकार आणि बीएनएचएस यांच्यामध्ये सामंजस्य करार होईल असे, राज्याच्या कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक वासुदेवन एन. यांनी सांगितले.

‘पाणथळ जागा आणि स्थलांतरित पक्षी’ या विषयावर बीएनएचएस-मार्फत लोणावळा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली. कांदळवन कक्ष यामध्ये समन्वयक म्हणून काम पाहणार आहे.

२.७७ कोटी खर्च अपेक्षित

पक्षीशास्त्राच्या अनुंषगाने महत्त्वाच्या असणाऱ्या पाणथळ जागा आणि स्थलांतरित पक्ष्यांची सद्य:स्थिती स्पष्ट करण्यासाठी विशेष अभ्यास असे या प्रकल्पाचे नाव आहे. हा अभ्यास प्रकल्प चार वर्षांसाठी असून, त्याचा खर्च सुमारे २.७७ कोटी रुपये आहे. या पाणथळ जागा पक्ष्यांच्या मध्य अशियायी स्थलांतर मार्गाशी निगडित आहेत. त्यामध्ये जायकवाडी (जि. औरंगाबाद), गंगापूर आणि लगतचा गवताळ (जि. नाशिक), नांदूरमधमेश्वर (जि. नाशिक), हातनूर (जि. जळगाव), उजनी धरण (जि. सोलापूर), विसापूर धरण (जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.

राज्यातील लोणार आणि नांदूरमधमेश्वर या दोन पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रामसर दर्जा मिळावा यासाठी रामसर परिषदेस प्रस्ताव पाठवले असून त्यावर लवकरच सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित असल्याचे या वेळी वासुदेवन यांनी सांगितले.

राष्ट्रीय कृती आराखडय़ामध्ये सहा मुद्दय़ांवर भर

* राष्ट्रीय कृती आराखडय़ामध्ये सहा मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. त्यापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वय आणि पक्ष्यांच्या स्थलांतरण मार्गाचे संवेदनशीलतेनुसार नकाशे (बर्ड सेन्सिटिव्हिटी मॅपिंग टूल) या दोन बाबी वगळून राज्यातील पाणथळ जागांचा अभ्यास या प्रकल्पात होईल.

* या अभ्यास प्रकल्पात प्रत्येक पाणथळ जागेशी निगडित २० अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी दिली.