सध्या सामाजिक माध्यमांवर पक्ष्यांची छायाचित्रे फिरू लागली आहेत. माझ्या घराच्या खिडकीतून हा पक्षी दिसला किंवा नाल्यावर हे पक्षी होते, असे संदेश लिहिलेले. पक्ष्यांची नावे माहिती नसली तरी हे नेहमीचे पक्षी नाहीत, हे छायाचित्र काढणाऱ्यांच्याही लक्षात येते. हे सर्व पक्षी म्हणजे मुंबईचे हिवाळ्यातील पाहुणे. हिवाळ्याचे दोन महिने सोडले तर मुंबईत दहा महिने उकाडाच असतो. अगदी मुसळधार पावसाचे दिवस वगळले तर. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील गुलाबी थंडीची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईकरांच्या या हिवाळ्याच्या प्रेमाला दिल्लीकर हसतातही. कारण दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. उलटपक्षी दिल्लीच्या तुलनेत मुंबईच्या थंडीतील वातावरण उबदार असते. दिल्लीकरांना वाटते त्याचप्रमाणे मुंबईत या काळात स्थलांतरित होत असलेल्या पक्ष्यांनाही वाटते आणि त्याचमुळे उत्तरेत सुरू झालेल्या थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी दरवर्षी अनेक पक्षी शेकडो ते हजारो किलोमीटर अंतर कापत या महानगरात येतात.

यावर्षीही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या आगमनाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अगदी थेट मुंबईत नाहीत तरी वसई, कर्नाळा, कल्याण, उरण, नवी मुंबई या महानगराच्या आजूबाजूच्या परिसरांत अनेक स्थलांतरित पक्षी दिसल्याच्या बातम्या येत आहेत. स्थलांतरित पक्षी म्हटले की रोहित (फ्लेमिंगो) पक्षी असे समीकरण गेली काही वष्रे पक्के झाले आहे. चमकदार गुलाबी रंगाचे पंख असलेल्या या मोठय़ा पक्ष्याने सर्व लक्ष स्वत:कडे केंद्रित करून ठेवले असले तरी रोहितप्रमाणेच किमान शंभर प्रजातींचे पक्षी या काळात मुंबईत तंबू टाकतात. पाणथळ जागेत दिसणारे बदक, बगळे, क्रौंच असे पक्षी पटकन नजरेत येतात. सीगलसारखे समुद्रपक्षी, खंडय़ा, कुरल, सुरय, शराटी, वंचक या प्रजातींचे पक्षीही या काळात सहजी दिसतात. ही नावे वाचून गोंधळल्यासारखे झाले का?

आपल्याला तर स्थानिक पक्ष्यांविषयीही फारशी माहिती नसते. चिमण्या, कावळे, कबुतर, घार, पोपट या पलीकडे किंवा फार तर भारद्वाज, कोकीळ, घुबड, साळुंकी यापलीकडे आपले पक्षीज्ञान जात नाही आणि त्यामागे कारण आहेत. शहरात वाढलेली घाण ही कावळ्यांसाठी खाद्य असते आणि या घाणीवर पोसणारे उंदीर हे घारींचे जेवण (उंदरांमुळे घुबडांची संख्याही वाढलीये म्हणे). कबुतरांची संख्या का वाढली आहे हे वेगळे सांगायला नको. या सगळ्या पक्ष्यांची संख्या एवढी जास्त आहे की त्यात इतर पक्ष्यांचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. त्यातच सतत फिरतीवर असलेल्या या पाखरांना पाहण्यासाठी थोडा निवांत वेळ काढण्याची गरज असते. अनेकदा केवळ आवाजावरून किंवा आकार, रंग, उडण्याची पद्धत, दिसण्याचे ठिकाण यावरूनही पक्षी ओळखता येतो. यासाठी सर्व इंद्रिय एकाच वेळी कार्यरत व्हावी लागतात. हे सर्व करण्याएवढी चिकाटी, वेळ किंवा उत्साह फारच कमी जणांकडे असल्याने पक्षीनिरीक्षणाकडे वळणाऱ्यांची संख्या कमी असते. मात्र एकदा हे जमले की त्यातील आनंद कळतो. त्यामुळेच मुंबई व आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी होत असलेल्या पक्षीगणनेत अनेक उत्साही, होतकरू तरुण सहभागी होतात. डिसेंबरमध्ये पानगळ सुरू होते. झाडावर पाने नसल्याने पक्षी पाहण्यास येणारे अडथळे कमी होतात आणि त्यामुळे साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पर्यावरण संस्थांकडून पक्ष्यांची प्रगणना केली जाते. गेली दहा वर्षे जानेवारीत ‘बर्डरेस’ होते. त्यामधून हाती आलेले निष्कर्ष मात्र तितकेसे उत्साहवर्धक नाहीत, खरे तर थोडे काळजी करण्यासारखेच आहेत. मुंबई महानगर प्रदेशात स्थानिक व स्थलांतरित असे साधारण ३५० प्रकारचे पक्षी आढळतात असे दहा वर्षांतील निरीक्षणावरून दिसले आहे. मात्र दरवर्षी ही संख्या कमी होते आहे. गेल्या वर्षी सुमारे २२० प्रकारचे पक्षी आढळले.

पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या रोडावणे तसे साहजिकच आहे. पक्ष्यांचे मुख्य निवासस्थान म्हणजे झाड. मात्र त्यातही काही पक्ष्यांना जंगलात, काहींना माणसांच्या आजूबाजूला तर काहींना बागांसारख्या ठिकाणी राहायला आवडते. काही पक्षी पाणथळ जागांमधील भक्ष्यासाठी तिथेच राहतात तर काही जण पाणथळ जागांवर वाढलेल्या खारफुटीच्या जंगलात आश्रय घेतात. तलावासारख्या पाण्याच्या ठिकाणीही काही पक्षी आढळतात. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वगळता यातील इतर सर्वच निवासस्थानांवर गदा आली आहे. शहरातील वाढलेला गोंगाट व प्रदूषण ही कारणेही आहेत. वास्तव्याचे ठिकाणच नसल्याने शहरात येण्याऐवजी हे पाहुणे नवीन घर शोधतात.

महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यात लाखभर झाडे वितरित करते, पण ती लावण्यासाठी शहरात जागाच शिल्लक नाहीत, त्याचे काय! मुंबईच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर जिथेजिथे शक्य असेल तिथे पाणथळ जागांवर अधिकृत किंवा अनधिकृतरीत्या भराव टाकून इमारती उभ्या राहताहेत. हे सर्व वाचवणे ज्यांचे काम आहे ते पालिका प्रशासन व राज्य सरकार विकास की पर्यावरण या गुंत्यात अडकलेय. नाही म्हणायला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळांच्या बैठकीत ट्रान्स हार्बर लिंकला परवानगी देताना माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबईतील पाम बीचजवळील पाणथळ जमीन व उरण येथील पांजे फुंडे क्षेत्र या तीन ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी पक्षी अभयारण्यांसाठी मंजुरी देण्यात आली. वर्षभरात त्याबाबत काही पाऊल पडल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा येत्या काळात हिवाळ्यातील हे पाहुणे पाहायलाही पर्यटनाला जावे लागण्याची शक्यता अधिक आहे.

प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com