लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय निरुपम यांना अध्यक्षपदावरुन हटवतानाच त्यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

संजय निरुपम यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून मुंबई काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा त्यांना विरोध होता. मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी होती. निवडणुकीत याच गटबाजीचा फटका बसू नये म्हणून हे फेरबदल करण्यात आले आहेत. संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला.

शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ साली ते मुंबईतून लोकसभेवर  निवडून गेले. त्यानंतर २०१४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला. आता काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत. दक्षिण मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर २००९ साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता. मनसेमुळे मराठी मतांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा त्यांना फायदा झाला होता. त्यानंतर २०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. मिलिंद देवरा यांनी संपुआ दोनच्या कार्यकाळात केंद्रात मंत्रीपद भूषवले आहे. आता मुंबई काँग्रेसमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.