मिलिंद देवरा यांनी स्वपक्षीय सरकारच्या विरोधात व्टिटरच्या माध्यमातून विरोधी सूर लावायचा आणि राहुल गांधी यांनी तसेच मतप्रदर्शन करायचे हे लागोपाठ दुसऱ्यांदा झाल्याने देवरा यांचे मत म्हणजे सूचक वर्दी असल्याचे काँग्रेसच्या गोटात मानले जाते.
कलंकित मंत्री किंवा लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याचा वटहुकूम काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यावर या विरोधात मिलिंद देवरा यांनी व्टिटरच्या माध्यमातून विरोधी सूर लावला होता. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवरा यांनी सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन केल्यावर हे राहुल गांधी यांचेच मत असावे, अशी शंका काँग्रेसच्या वर्तुळात होती. दोनच दिवसांत राहुल गांधी यांनी जाहीरपणे मतप्रदर्शन केले होते. ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाच्या विरोधात दोनच दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी वेगळा सूर आवळला आणि निर्णयाच्या फेरविचाराची मागणी केली. तेव्हाच राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनात संशय घोळावला होता. राहुल गांधी यांनी शुक्रवारी मतप्रदर्शन केल्याने काँग्रेस नेत्यांची शंका खरी ठरली.