‘पिंकथॉन’ या शब्दावरून अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानंतर बंगळुरू येथील स्वयंसेवी संस्थेला शेवटच्या क्षणाला अंधांसाठी आयोजित ‘पिंकथॉन’ ही मॅरेथॉन रद्द करावी लागली आहे. न्यायालयानेही संस्थेला यापुढे ‘पिंकथॉन’ या शब्दाचा वापर करण्यास मज्जाव केला आहे.
स्तनाचा कर्करोग वा स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित अन्य समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी मिलिंद सोमण याची ‘मॅक्सिमस माइस अ‍ॅण्ड मीडिया सोल्युशन प्रा. लि.’ ही कंपनी ‘युनायटेड सिस्टर्स फाऊंडेशन’ या कंपनीच्या सहकार्याने २०१२ पासून देशातील विविध शहरांमध्ये ‘पिंकथॉन’ ही मॅरेथॉन आयोजित करत आहेत. मुंबईतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
२०१३ मध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यापुढे देशातील अन्य शहरांमध्येही ती आयोजित केली जाणार आहे. गेल्या चार वर्षांत उपक्रमाला मिळालेल्या यशामुळे कंपनीतर्फे ‘पिंकथॉन’च्या नोंदणीसाठी संबंधिक यंत्रणेकडे अर्जही करण्यात आला आहे. मात्र अंधांसाठी काम करणाऱ्या बंगळुरू येथील ‘आयडीएल’ या स्वयंसेवी संस्थेने ६ मार्च रोजी ‘ब्लाइंड पिंकथॉन’चे आयोजन केले आहे ही बाब समजताच सोमण याच्या कंपनीने त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच संस्था ‘पिंकथॉन’ या शब्दाचा वापर करू शकत नाही. त्यामुळे संस्थेला या शब्दाचा वापर करण्यापासून रोखावे आणि रविवारच्या मॅरेथॉनसाठी त्याचा वापरून केलेल्या नुकसानाचीभरपाई म्हणून २५ लाख रुपये देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
प्रकरण न्यायालयात आल्यानंतर दोन्ही पक्षांना न्यायालयाने ते परस्पर सामंजस्याने सोडवण्याची सूचना केली होती. त्याच्याच पाश्र्वभूमीवर बंगळुरू येथील संस्थेने माघार घेत अखेर अंधांसाठीची ‘पिंकथॉन’ रद्द केल्याचे न्यायालयाला कळवले. न्यायालयाने‘पिंकथॉन’ नावाखाली कुठलाही उपक्रम आयोजित करण्यास संस्थेला मज्जाव केला आहे.