महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) सदस्य असतानाही दूध संघाला नियमितपणे दूध पुरवठा न केल्याप्रकरणी काही दूध संघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरेश धस, महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील आदी बडय़ा नेत्यांच्या दूध संघांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महानंदचे सदस्य असलेल्या दूध संघांना महानंदला नियमितपणे दूध पुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र या दूध संघांनी महानंदला दूध पुरवठा केलेला नाही. त्यामुळे महानंदला बाजारातून जादा दराने दूध खरेदी करावे लागले. यात महानंदला एका वर्षांत ५४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे महानंदचे सदस्य असलेल्या दूध संघांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. १०५ पैकी तब्बल ७६ दूध संघांनी महानंदला नियमितपणे दूध पुरवठा केला नसल्याचे उघडकीस आले असून या सर्व संघांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
महानंदचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी या नोटिसा बजावल्या असून त्यात अजित पवार, विनायक पाटील आणि सुरेश धस अशा बडय़ा राजकारण्यांच्या दूध संघांचाही समावेश आहे.