मुंबईत परराज्य किंवा परजिल्ह्य़ातून येणारे दूध भेसळमुक्त असून काही ठिकाणी दुधाचा दर्जा मात्र कमी प्रतीचा असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळले आहे. कमी दर्जाचे सुमारे साडेतीन हजार लिटर दूध प्रशासनाने परत पाठविले असून यांचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत.

मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी मोहीम गुरुवारी व शुक्रवारी प्रशासनाने राबविली. यात दहिसर, मानखुर्द, ऐरोली, मुलुंड चेकनाका पूर्व, मुलुंड चेकनाका एलबीएस या ठिकाणी येणाऱ्या १७० दुधाच्या वाहनांमधून सुमारे ६ लाख ६३ हजार लिटर दुधाची तपासणी केली गेली. यामध्ये २५४ दुधाचे नमुने तपासले असून सात नमुन्यांमध्ये कमी दर्जाचे दूध असल्याचे आढळले. मुलुंड चेकनाका पूर्व येथे पाच तर मानखुर्द येथे दोन नमुन्यांमध्ये दुधाचा दर्जा कमी प्रतीचा असल्याचे निदर्शनास आल्याने अनुक्रमे १४३२ व २२०० लिटर दुधाचा साठा परत पाठविला. शहरातून एकूण एक लाख ७१ हजार रुपयांचा ३६३२ लिटर साठा कमी दर्जाचा असल्याने परत पाठविला आहे.

कोणत्याही दुधात शरीराला अपायकारक अशा पदार्थाची भेसळ केल्याचे आढळले नाही. दूध शहरात आल्यानंतर झोपडपट्टी भागांमध्ये बहुतांश वेळा पाण्याची भेसळ केली जाते. कमी प्रतीच्या दुधाच्या सात नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच दर दोन ते तीन महिन्यांनी तपासणी केली जाणार आहे.

– श.रा. केकरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त