ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन ते पाच रुपयांपर्यंत कपात करण्याचे आदेश राज्य सरकारने दूध वितरण संस्थांना दिले आहेत. अर्थात, राष्ट्रवादी वा काँग्रेसचे वर्चस्व असलेले दूध महासंघ सरकारची सूचना कितपत गांभीर्याने घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दूध वितरकांनी दर कमी करावेत हे आवाहन करतानाच ग्राहकांची होणारी लूटमार थांबविण्याकरिता दर नियंत्रण कायदा करण्यात येणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूधाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आता शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील मुलांना भुकटीचे दूध देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
 दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून ग्राहकांनाही कमी दराने दूध मिळावे यासाठी दूध विक्रेत्या संस्थांनी आपला नफा कमी करून दूध विक्री करावी. दुधाच्या दरात प्रति लिटर किमान दोन ते पाच रुपयांची कपात करावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. दुधातील भेसळ रोखण्यासाठी पथके कार्यरत असून तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर दुधाची भुकटी तयार केली जात आहे. मात्र त्यास परदेशात भाव मिळत नसल्याने आता ही भुकटी पोषण आहार दिल्या जाणाऱ्या शाळा आणि अंगणावाडय़ातील मुलांना दुधासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनीही त्यास संमती दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

ग्राहकांना कमी दराने दूध मिळावे यासाठी दूध विक्रेत्या संस्थांनी आपला नफा कमी करून दूध विक्री करावी. दोन ते पाच रुपयांनी दर कमी करावेत, अशी आमची सूचना आहे.
-एकनाथ खडसे, दुग्धविकासमंत्री