शेतकऱ्यांचे दूध केवळ २० रुपये दराने घेऊन ग्राहकांना ते ४० रुपयांहून अधिक चढय़ा भावाने विकणाऱ्या दुग्धविकास संस्था व व्यापाऱ्यांनी आपल्या नफेखोरीला आवर घालावा आणि शेतकरी व ग्राहकांचाही विचार करावा, असे आवाहन दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. याप्रश्नी संबंधितांची बैठक येत्या मंगळवारी घेतली जाणार असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुद्दे मांडण्यास परवानगी न दिल्याने गोंधळ झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात दूधाच्या भुकटीच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने आणि शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध खरेदी केले जात नसल्याने ते अडचणीत आहेत. दूध फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असे मुद्दे गणपतराव गायकवाड, बाबूराव पाचर्णे आदींनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये उपस्थित करण्यात आले होते. शेतकऱ्यांना दूध भुकटी बनविणाऱ्यांना १० रुपयांपर्यंत अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे,  खासगी उत्पादकांना मात्र मदत देणार नाही, असे खडसे यांनी सांगितले.