अशोक तुपे, श्रीरामपूर

गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे बंधन राज्य सरकारने घातल्यानंतर अवघ्या आठच दिवसांत सहकारी व खासगी प्रकल्पाच्या चालकांनी आता पिशवीबंद दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे, पुण्यासह मोठय़ा शहरातील ग्राहकांना प्रतिलिटर ३ ते ५ रुपये जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ काहींनी शनिवारपासून तर सोमवारपासून लागू केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दूध प्रकल्पांचे चालक व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढला. गायीच्या दुधाला शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे ठरले. दूध भुकटी तयार  करणाऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र पिशवीबंद दूध विक्री करणाऱ्यांना कोणतेही अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना दरवाढ देण्यास विरोध केला होता. त्यानंतर दुग्धविकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी बैठक घेतली होती. मुंबईत विक्रेत्यांना असलेल्या योजना बंद करण्याचे ठरले होते. सरकारने मुंबईसह मोठय़ा शहरातील ग्राहकांना दरवाढ करू नये, असे आदेश दिले होते.

राज्यात दूध भुकटी तयार करणारे मोजकेच २२ प्रकल्प आहेत. मात्र पिशवीबंद दुधाची विक्री करणाऱ्या प्रकल्पांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांकडून २५ रुपये दराने दूध खरेदी केल्यानंतर बाजारपेठेत ४० रुपये दराने विक्री करताना त्यांना तोटा येतो. तसेच पिशवीबंद दुधाच्या विक्रीत स्पर्धा असून ठोक विक्रेते, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते यांच्यात साखळी आहे. विक्रेत्याने आपल्याच ब्रॅण्डचे दूध विकावे म्हणून त्यांच्यासाठी अनेक विक्रीवाढ योजना होत्या. १० पिशवीमागे २ पिशव्या फुकट, तर काही एका पिशवीवर एक पिशवी फुकट देत होते. या स्पर्धेतून विक्रेत्यांच्या साखळीवरच मोठे कमिशन जाते. आता या विक्रीवाढ योजना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतेक प्रकल्पांनी प्रतिलिटर २ ते ५ रुपये दरवाढ केली आहे. कुतवळ, साईनंद, स्वराज, नेचर, नवनाथ, कृष्णा, शिवरत्न, सुयोग, सोनाई, मुक्ताई, राजहंस, डेअरीपॉवर, नॅचरल, संजीवनी, पराग, एस. आर. थोरात, गोकुळ, प्रभात, वारणा, गोदावरी यांनी दरवाढ केली आहे. या प्रकल्पांनी शनिवार दि. ११ पासून ही दरवाढ लागू केली आहे.

सोनाई दूधने सर्वात कमी २ रुपये दरवाढ केली आहे. तर अन्य प्रकल्पांनी ३ ते ६ रुपये दरवाढ केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना २५ रुपये लिटर दर देण्याचे बंधन घातले असले तरी पिशवीबंद दूध विक्रीस कुठलेही अनुदान व सवलत दिलेली नाही. त्यामुळे दरवाढ करावी लागत आहे, असे त्यांनी विक्रेत्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. दुधाच्या पिशवीवर आता एका लिटरसाठी कमाल विक्री किंमत ४४ रुपये असणार आहे. ३.५ स्निग्धता व ८.५ स्निग्धेत्त घटक असलेल्या दुधासाठी ही दरवाढ लागू झाली आहे. टोण्ड व डबलटोण्ड दुधाचा दर ३८ ते ४०  रुपये ठेवण्यात आला आहे.

२५ रुपये दराने दूध खरेदी करून ते बाजारात ४४ रुपयांनी विकले तरीदेखील प्रकल्पांना तोटा होतो. सुमारे ८ रुपये तोटा प्रतिलिटर होत होता. तो कमी करण्यासाठी ३ ते ५ रुपये दरवाढ करण्यात आली. तरीदेखील अजून ३ रुपये तोटा होत आहे. विक्रीवाढ योजना बंद करण्यात आल्या आहेत.  – दशरथ माने, संचालक, सोनाई दूध