दोन हजार गावांत दूध व्यवसाय विकास कार्यक्रम

विदर्भ व मराठवाडय़ात दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दोन हजार गावांत दूग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

या विभागांत श्वेतक्रांतीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सहकार्याने विशेष प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी घेतला.  या प्रकल्पाच्या माध्यमातून तीन वर्षांत प्रतिदिन दोन लाख किलोग्रॅम एवढे दुध उत्पादन अपेक्षित असून त्याद्वारे २०० कोटी रुपये एवढी रक्कम दुध उत्पादकांना मिळणार आहे.

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नागपूर येथे नव्याने १००दुध विक्री केंद्रे स्थापन करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे मंत्री महादेव जानकर, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे चेअरमन दिलीप रथ, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर. जी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नक्की काय होणार?

विदर्भातील पाच व मराठवाड्यातील तीन जिल्हे अशा एकूण आठ जिल्ह्य़ातील दोन हजार गावांत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  या उपक्रमातून ६० हजार कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजिविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील सुमारे तीन हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार, वितरक, किरकोळ विक्रेते व अन्य सुविधा पुरविणारे यांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.