फंजिबल चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याची शासनाची अधिसूचना

गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे निर्माण करण्याचे शासनाकडून प्रयत्न होत नसले तरी गिरण्यांच्या जागेवर असलेल्या चाळीतील कामगारांना यापुढे मात्र ३०० ऐवजी ४०५ चौरस फुटाचे घर मिळणार आहे. गिरण्यांच्या जमिनीवरील गृहप्रकल्पातील पुनर्वसन इमारतींना मोफत फंजिबल चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याची अधिसूचना शासनाने अलीकडेच जारी केली. या अधिसूचनेमुळे मुंबईतील सहा हजार गिरणी कामगारांना त्याचा फायदा मिळणार आहे.

मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीवर १७ चाळी आहेत. या चाळींतून अंदाजे सहा हजार गिरणी कामगारांचे वास्तव्य आहे. गिरणीतील नोकरी गेल्यानंतर कामगाराला घर सोडावे लागत होते. परंतु गिरणी कामगार संघर्ष समितीने या कामगारांना त्याच ठिकाणी घरे मिळावीत, अशी मागणी लावून धरली होती. अखेरीस शासनाने ते मान्य केले होते. परंतु या कामगारांना  विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार ३०० चौरस फुटाचेच घर मिळू शकणार होते. मात्र या कामगारांना फंजिबल चटईक्षेत्रफळाचा लाभ दिल्यास त्यांना आणखी मोठे घर मिळू शकेल, असे समितीने विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळून मोफत फंजिबल चटईक्षेत्रफळाबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे या चाळी विकसित करणाऱ्या गिरणीमालकांना कामगारांना आता ४०५ चौरस फुटाचे घर द्यावे लागणार आहे.

म्हाडाने आतापर्यंत १० गिरण्यांची जमिन ताब्यात घेतली आहे. परंतु या जमिनीवर अद्याप घराचे बांधकाम सुरू केलेले नाही. ते तात्काळ सुरू करावे तसेच पनवेल येथे रेल्वे स्थानकाशेजारी मुंबई महानगर प्रादेशिक रचना प्राधिकरणाने बांधलेली अडीच हजार घरे पडून आहेत.

फंजिबल एफएसआय?

लॉबी, लिफ्ट, जिने, फ्लॉवर बेड, लिलि पॉड, बाल्कनी आदींसाठी वापरण्यात आलेले क्षेत्रफळ म्हणजे फंजिबल एफएसआय. २०१२ पूर्वी हे चटई क्षेत्रफळ मोफत दिले जात होते. हे चटई क्षेत्रफळ ३५ टक्के गृहित धरून प्रीमिअम आकारण्यात येतो.

सहा भूखंडांवर काम सुरू

मुंबईत ५८ गिरण्या असून सुमारे ३८ एकर भूखंडावर त्या व्यापलेल्या आहेत. या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी १६ हजार ७०० घरे आणि संक्रमण शिबिरात सुमारे आठ हजार घरे बांधली जाणार आहेत. आतापर्यंत ३३ गिरण्यांचे भूखंड ताब्यात आले आहेत. त्यापैकी १९ गिरण्यांच्या भूखंडावर ६९४८ घरे उभारण्यात आली आहेत. तर सहा गिरण्यांच्या भूखंडावर २६४३ घरे उभारण्याचे काम सुरू आहे. आठ गिरण्यांच्या भूखंडावर ६६३४ घरे उभारली जाणार आहेत. तीन गिरण्यांतील भूखंडाचा ताबा अद्याप मिळालेला नाही.