मुंबईतील गिरणी कामगारांना १८ गिरण्यांच्या जागेवर २८ जून २०१२ रोजी घरांचे प्रथम वाटप करण्याला मंगळवारी चार वर्षे पूर्ण होत आहे. याचे निमित्त साधून ३० जूनला सायंकाळी ४ वाजता परळ येथील दामोदर हॉल येथे मुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री तसेच परिवहनमंत्र्यांच्या आणि गिरणी कामगारांच्या उपस्थितीत चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. मात्र या गिरणी कामगारांना मिळालेल्या घरांमध्ये पाणी गळण्यापासून अनेक समस्या उभ्या राहिल्याने या वर्धापन दिनाचा आनंद झाकोळल्याची चर्चा गिरणी कामगारांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.
राज्यातील भाजप सरकारने गेल्याच महिन्यात ६ गिरण्यांमधील कामगारांना २६३४ घरांचे वाटप केले होते. तसेच ऑगस्ट महिन्यात २४१७ घरांचे वाटप करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केली होती व १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना नक्की घरे मिळतील, अशीही त्यांनी ग्वाही दिली होती. त्यामुळे घरे न मिळालेले गिरणी कामगार हर्षोल्हसित झाले आहेत. मात्र ज्या गिरणी कामगारांना चार वर्षांपूर्वी घरे मिळाली त्यांच्या घरांमध्ये पाणी गळणे, फुटलेल्या मैला वाहिन्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, भिंतींना भेगा तसेच बंद पडलेल्या लिफ्ट्स आणि न होऊ शकलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ा आदी समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे चार वर्र्षांपूर्वी घरे मिळाली खरी, मात्र त्याच्या वर्धापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर या घरांचे भीषण वास्तव सामोरे आले आहे. तसेच गिरणी कामगारांना कधीपर्यंत आणि कोठे घरे देणार याची आकडेवारी शासनाने तात्काळ सादर करावी, अन्यथा सनदी अधिकाऱ्यांची समिती बसवून माहिती मिळवू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात शासनाला दिली आहे. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या या गिरणी कामगारांच्या घरांच्या वर्धापन दिनावर सरकारी अनास्थेचे सावट असल्याचे दिसत आहे. तरीदेखील सर्व राजकीय पक्ष गिरणी कामगारांच्या पाठीशी उभे राहिले आणि कामगारांनीही एकजूट दाखवली याचे कौतुक करण्यासाठी चौथ्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, परिवहनमंत्री दिवाकर रावते येणार असल्याने ते कामगारांना या वर्धापन दिन मेळाव्यात कोणती आश्वासने देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.