मुंबईमधील कापड गिरण्यांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या संपानंतर देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांसाठी आधारवड ठरलेले, अनेक आंदोलनांचे साक्षीदार आणि गिरण्यांच्या जमिनींवर कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी झटणारे झुंजार कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाात पत्नी, चार मुले, नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईमधील गिरणी कामगार सातत्याने वेतन वाढीची मागणी करत होते, मात्र गिरणी मालकांनी मागणी मान्य न केल्यामुळे अखेर १९८२ मध्ये गिरणी कामगार संपावर गेले. २ लाख ५० हजार कामगार संपावर गेले आणि गिरण्यांची धडधड बंद झाली. मालक आणि कामगार संघटनांमधील बोलणी फिस्कटत गेली आणि संप चिघळला. संप मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबावतंत्रही अवलंबण्यात आले. या संपाचे साक्षीदार आणि कामगारांसाठी झटणाऱ्या तरुणांपैकी दत्ता इस्वलकर एक होते. गिरणी कामगारांच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या कामगार नेत्यांचा सहवास लाभला होता. कामगार नेते मंडळींच्या मुशीत तयार झालेल्या दत्ता इस्वलकर यांनी कामगारांच्या विविध प्रशद्ब्राांसाठी २ ऑक्टोबर १९८९ रोजी संघर्ष सुरू केला. कामगारांचे विविध प्रशद्ब्रा धसास लावण्यासाठी गिरणी कामगार संघर्ष समितीची मुहूर्तमेढ रोवली. कामगारांच्या मदतीने १९८८ ते १९९० या काळात १० कापड गिरण्या सुरू केल्या. तसेच स्वेच्छा निवृत्ती घेण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना चांगले पैसे मिळवून देण्यासाठी ते झटले. गिरण्यांच्या जमिनीवर होणाऱ्या विकासात कामगारांना रोजगार मिळावा, तसेच तेथे हक्काची घरे मिळावी यासाठी त्यांनी लढा उभारला होता. या लढ्याला यशही आले. गिरण्यांच्या जागेवरील इमारतींमध्ये १५ हजारांहून अधिक गिरणी कामगारांना त्यांनी घरे मिळवून दिली. गिरणी कामगारांच्या वारसांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. गिरणी कामगारांच्या प्रशद्ब्राासाठी ते अखेरपर्यंत झटत होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या पश्चाात दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांसाठी आधारवड बनले होते.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. बुधवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल  करण्यात आले. मेंदूमध्ये रस्तस्रााव होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.