गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी विरोधी पक्षात असताना पोटतिडकीने भांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यानंतर मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यातील १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांनी हक्काच्या घरासाठी सरकारकडे अर्ज केले आहेत. याआधी सहा हजार गिरणी कामगारांना घरेही मिळाली. पण, उर्वरित गिरण्यांच्या जागेवर करायचे असलेले बांधकाम आणि इतर गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न कधी आणि कसा सोडवणार, याबद्दल मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. या कारभारामुळे गिरणी कामगार संघटना नाराज असून सरकारविरोधात १५ जुलैला विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने दिला आहे.