News Flash

लाखो घरकामगार महिला लाभापासून वंचित

करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक घरांनी कामावरून काढून टाकले.

|| अमर सदाशिव शैला

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी लाभापासून वंचित राहणार आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक घरांनी कामावरून काढून टाकले. सध्या रेल्वे प्रवासावरील निर्बंधांमुळेही महिलांना घरकामासाठी जाणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षभरापासून अनेक घरकामगार महिलांचा रोजगार बुडला आहे. सध्या याच महिलांना सरकारची १५०० रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र, ही मदत घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी झालेल्या महिलांनाच मिळणार आहे.

मंडळच निष्क्रीय…

घरेलू कामगार कल्याण मंडळ घरकामगारांसाठी विविध योजना राबवत असे. मात्र गेल्या काही वर्षात हे मंडळ निष्क्रीय आहे. अनेक योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात नोंदणी केलेल्या अनेक महिलांनी मागील काही वर्षात नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही. तसेच घरकामगारांसाठी असे काही मंडळ आहे, याचीही अनेकजणींना माहिती नाही. त्यातून सद्यस्थितीत घरकामगार मंडळाकडे नोंदणीकृत आणि या नोंदणींचे नुतनीकरण झाले अशा केवळ १ लाख ५ हजार महिला आहेत.

‘मंडळाकडे सुमारे १ लाख घरेलू कामगार महिलांची माहिती उपलब्ध आहे. त्यांना मदत निधी पोहचविण्याची तयारी सुरू आहे,‘ असे विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार यांनी सांगितले.

नोंदणीपेक्षा घरकामगारांची संख्या मोठी

‘मुंबई आणि परिसरात सुमारे ५ लाख घरकामगार महिला काम करतात. मंडळाने या घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी कधी पुढाकार घेतला नाही. आताही कामगार कार्यालयात महिन्यातील केवळ एकच दिवस नोंदणी केली जाते,‘ असे कष्टकरी घरकामगार संघटनेच्या मधु विरमुडे यांनी सांगितले.

‘राज्यभरात जवळपास ३५ लाख घरकामगार महिला आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नोंदणीसाठी दिलेले अर्ज कामगार मंडळाकडे पडून आहेत. मंडळाकडून घरेलू कामगारांना मातृत्वासाठी आणि अंत्यविधीसाठी २००० रुपये मदत दिली जात होती. घरकामगारांसाठी असलेली आम आदमी योजना आणि त्यांच्या ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती योजना बंद झाली आहे,‘ अशी माहिती मुंबई, नवी मुंबई घरकामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी आरमायटी इराणी यांनी दिली.

नोंदणी, मंडळ, सुविधांची माहितीच नाही…

नयना खंडागळे गेल्या १६ वर्षांपासून घरकाम करतात. नेरळवरून ठाणे असा लोकल प्रवास करून त्या घरकामासाठी येतात. त्यातून महिन्याला ८ हजार रुपये मिळत होते. टाळेबंदीनंतर लोकल प्रवासावर निर्बंध आल्यानंतर त्यांची नोकरी गेली. ‘२००८ मध्ये घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी केली होती. काही वर्षे त्याचे नुतणीकरण केले. मात्र मंडळाकडून कोणताच लाभ मिळत नसल्याने पुढे नुतनीकरण करणे सोडून दिले. आता नोंदणी आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याबरोबरच्या इतर महिलांचीही हीच परिस्थिती आहे,‘ असे खंडागळे यांनी सांगितले.

‘गेल्या ५० वर्षांपासून मी घरकाम करते आहे. माझी आईही हेच काम करत होती. आमच्यासाठी कोणते मंडळ आहे याची माहिती नाही.  सरकारकडून कधी कोणती मदत मिळाली नाही. गेल्यावर्षी मार्चमध्ये काम गेले. आता चार महिन्यांपूर्वी काही कामे मिळाली आहेत, त्यातच उदरनिर्वाह होत आहे,‘ असे जुहू परिसरात घरकाम करणाऱ्या वासंती पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:47 am

Web Title: millions of domestic workers are deprived of benefits akp 94
Next Stories
1 महाराष्ट्रात एप्रिलमध्ये मृतांच्या संख्येत २५ टक्के वाढ
2 एमके सीएलतर्फे  ‘आयटीत मराठी’ उपयोजन
3 West Bengal Election 2021 Result : या निवडणुकीमुळे पश्चिम बंगाल कम्युनिस्ट व काँग्रसेमुक्त झाला – फडणवीस
Just Now!
X