मुस्लीम समाजाला गृहीत धरून निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या एमआयएमला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत चांगलाच झटका बसला. या निवडणुकीत मुस्लीम समाजाने काँग्रेसवरचा राग काढण्यासाठी एमआयएमला प्रतिक्रियात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसते. मुस्लीम लीगच्या वाटेने जाणाऱ्या एमआयएमच्या घसरणीची ही सुरुवात असल्याचे मानले जाते. काँग्रेससाठी मात्र हा निकाल चिंता वाढविणारा आहे.
राज्यात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएमने दोन जागा जिंकून आणि सहा-सात मतदारसंघांत भरघोस मते घेतल्याने राजकीय क्षेत्राला तो आश्चर्याचा धक्का होता. केंद्रात व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याकांबद्दलच्या फसव्या व बोटचेप्या धोरणाला मुस्लीम समाज वैतागला होता. भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करण्यासाठी त्यांना पर्याय हवा होता, तो एमआयएमच्या रूपाने मिळाला. त्यामुळेच एमआयएमचे औरंगाबाद व मुंबईतून दोन उमेदवार विजयी झाले. एमआयएमच्या प्रवेशामुळे त्याचा अनेक मतदारसंघांत काँग्रेसला फटका बसला.
वांद्रे पूर्व मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांना गृहीत धरून एमआयएमने मागील निवडणुकीत व आताच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला होता. विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने काँग्रेसवरचा राग काढण्यासाठी एमएमआयला जवळ केले. परंतु आताची परिस्थितीत बदललेली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. गोवंश हत्याबंदीचा कायदा किंवा मुस्लीम आरक्षण रद्द करणे या भाजप सरकारच्या निर्णयामुळे या समाजातील नाराजीचा आपल्याला फायदा मिळेल, असे काँग्रेसला वाटत होते. तर, मुस्लीम समाज आपल्या बाजूने उभा राहील अशी एमआयएमची अटकळ होती. निवडणूक निकालानांतर वेगळेच चित्र पुढे आले. मागील निवडणुकीत सुमारे २४ हजार मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या एमआयएमला या वेळी जेमतेम १५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. एमआयएमच्या नेतृत्वाने मुस्लीम एके मुस्लीम असा प्रचार केला. काँग्रेसतर्फे नारायण राणे यांच्याऐवजी नसिम खान किंवा अमिन पटेल उमेदवार असते तर, त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला असता, या ओवेसी यांच्या वक्तव्यावरून राजकीय पटलावरून लोप पावलेल्या मुस्लीम लीगचीच एमएमआय ही नवी आवृत्ती असल्याचे दाखवून दिले. मुस्लीम समाजाने त्याला दाद दिली नाही