News Flash

राज्यात पहिले यश मिळालेल्या नांदेडमध्ये ‘एमआयएम’ची कसोटी

११पैकी दहा नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

११पैकी दहा नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी; मालेगाव, भिवंडी, परभणीच्या मुस्लीम पट्टय़ात पीछेहाट

ऑल इंडिया मजलिस-ई-इतिहुद्दीन-मुस्लीमन म्हणजेच एमआयएम या पक्षाला महाराष्ट्रात प्रवेश आणि पहिले यश मिळाले पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये. एमआयएमच्या या यशाने राज्याच्या राजकारणाची समीकरणे काही प्रमाणात पुढे बदलत गेली. अल्पसंख्याकबहुल शहरांमध्ये पक्षाचा बोलबाला झाला, पण पुढेपुढे एमआयएमची घसरण सुरू झाली. पहिले यश मिळालेल्या नांदेडमधील ११पैकी दहा जण पक्ष सोडून गेले. त्या नांदेडमध्ये पुन्हा यश मिळविण्याचे मोठे आव्हान एमआयएमसमोर आहे.

हैदराबादमध्ये ताकद असलेल्या एमआयएमबद्दल मराठवाडय़ात २०१० नंतर आकर्षण निर्माण झाले. त्याच दरम्यान मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम तरुणांची पोलिसांनी धरपकड केली होती. एमआयएमच्या वाढीस वातावरण पोषक तयार झाले. हैदराबादच्या जवळ असलेल्या नांदेडमध्ये एमआयएमने पद्धतशीरपणे शिरकाव केला. २०१२च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले आणि राजकीय वातावरण बदलले. एमआयएमच्या वाढीचा फटका साहजिकच काँग्रेसला बसला. मराठवाडय़ात एमआयएमने हातपाय पसरले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमधून इम्तियाज जलिल आणि मुंबईतून वारिस पठाण हे दोन आमदार निवडून आले. महानगरपालिकेत    काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना एमआयएमचा फटका बसला. त्यानंतर झालेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले होते. एमआयएमची वाढती ताकद ही काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा होता.

गेल्या वर्षी झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमची ताकद दिसली. बीड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने चांगली लढत दिली. एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. अमरावती महानगरपालिकेत एमआयएमचे दहा नगरसेवक मुस्लीमबहुल प्रभागांमधून निवडून आले. राज्यातील मुस्लीमबहुल विभागांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देण्यात आला. पक्षाचे नेते खासदार असाउद्दिन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरउद्दिन ओवेसी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले. मराठवाडा व अन्य काही विभागांमध्ये पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत गेला असला तरी पक्ष संघटन उभे राहू शकले नाही. पक्षाची चांगली बांधणी नसल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले.

मुंबईसह राज्याच्या अन्य भागांमध्ये एमआयएमची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेस वा समाजवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आले. आमदार वारिस पठाण यांच्या भायखळा मतदारसंघातही एमआयएमला तेवढे यश मिळाले नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या लातूर, भिवंडी, मालेगाव, परभणी या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला यश मिळू शकले नाही. लातूरमध्ये एमआयएमने मुस्लीम आणि दलित अशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. स्वत: खासदार असाउद्दिन ओवेसी यांनी लातूरचा दौरा केला.

पण लातूरमध्ये पक्षाला यश मिळू शकले नाही. मराठवाडय़ातील परभणी या अन्य महानगरपालिका निवडणुकीतही मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला यश मिळाले. परभणीतील मुस्लीम मतदारांनी एमआयएमला साथ दिली नाही. अलीकडेच झालेल्या मीरा-भाईंदरमध्ये अल्पसंख्याकबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

भिवंडी आणि मालेगाव या मुस्लीमबहुल शहरांमध्येही एमआयएमचा प्रभाव पडला नाही. या दोन्ही शहरांमध्ये काँग्रेसला यश मिळाले. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला मतदारांनी मते दिली नाहीत. मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

नांदेडमध्ये पुन्हा यश मिळेल

एमआयएम पक्षाला महाराष्ट्रात यश मिळाले ते नांदेडमध्ये. त्या यशानंतरच पक्षाने महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये हातपाय पसरले. एमआयएमने नांदेडमध्ये चांगले काम केले आहे. शहरात विविध उपक्रम सुरू केले. गोरगरिबांसाठी मोफत उपचार केंद्र चालविले जाते. आमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे खरे असले तरी त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. कारण मतदार आजही आमच्याबरोबर आहेत. पक्षात ये-जा सुरूच असते. नांदेडमध्ये प्रचाराकरिता खासदार असाउद्दिसन आणि त्यांचे बंधून अकबरउद्दिन ओवेसी हे दोघेही येणार आहेत. गेल्या वेळेपेक्षा पक्षाला अधिक यश मिळेल.   आमदार इम्तियाज जलिल, एमआयएम

उत्तरेकडील मतदारांची साथ नाही

एमआयएम हा हैदराबादस्थित पक्ष आहे. या पक्षाला उत्तर भारतात तेवढा प्रतिसाद मिळत नाही हे उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले. भिवंडी, मालेगाव या मुस्लीमबहुल शहरांमध्ये बहुसंख्य उत्तर भारतातील मजूर आहेत. उत्तर भारतातून स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याकांना त्यामुळेच एमआयएमचे तेवढे आकर्षण नाही. ‘हैदराबाद की बिर्यानी उत्तर भारत में नही चलती’ असा प्रचार बिहारच्या निवडणुकीच्या वेळी झाला होता.

एमआयएमबद्दल भ्रमनिरास

मुस्लीमबहुल प्रभागांमधील नागरिकांमध्ये एमआयएम पक्षाबद्दल नाराजी पसरली आहे. पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय एमआयएमचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले आहेत. गेल्या वेळी काही विशिष्ट कारणांमुळे यश मिळाले होते. पण आता तशी परिस्थिती नाही. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल.   आमदार अमर राजूकर, काँग्रेस 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2017 2:41 am

Web Title: mim in nanded election
Next Stories
1 कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘फाईल’ शासनाकडून गहाळ
2 हॉटेल, बार, मॉल, उपहार गृहांमध्ये महिलांना सक्तीची रात्रपाळी नाही!
3 ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘भ’ जीवनसत्त्व
Just Now!
X