पुलवामा दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्ताननेच कट रचून हा हल्ला घडवून आणला. पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही सरकारसोबत आहोत असे एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी शनिवारी शिवाजी पार्कवरील सभेत म्हणाले. मुंबईत वंचित बहुजन आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. हा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद माझ्या दृष्टीने जैश-ए-शैतान आहे. मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान आहे अशा शब्दात ओवेसींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

जैशने पुलवामामध्ये केलेला हल्ला पहिला हल्ला नाही. याआधी सुद्धा त्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केला आहे. जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा आम्ही सर्व एक आहोत हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे असे ते म्हणाले. भारतात विविधतेत एकता आहे. हिंदुस्थानात मशिदीत नमाज अदा होणार, मंदिरात घंटा वाजणार हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातील राजकारण्यांनी हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता करु नये. आम्ही मोहम्मद अली जिना यांना त्याचवेळी धुडकावलं आणि हिदुंस्थानला निवडल आहे हे लक्षात ठेवा.

पाकिस्तानच्या धमक्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. त्यांचे इशारे आम्ही पायाच्या चप्पलेखाली ठेवतो अशा शब्दात पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानवर टीका करतानाच २०० किलो आरडीएक्स भारतात कसे आले ? याचा सुद्धा फोटोसेशनमधून वेळ मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करावा. हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का ? असा सवाल त्यांनी केला.

मसूद अजहरवर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणण्यात चीनने खोडा घातला. तुम्हीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना झोपाळयावर बसवलेत. वुहानमध्ये परिषद घेतलीत हे तुमचे राजनैतिक अपयश आहे अशी टीका त्यांनी मोदींवर केली. देश प्रश्न विचारतोय. मोदी तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. मॉब लिचिंग होते तेव्हा तुम्ही गप्प बसता नंतर सात-आठ दिवसांनी बोलता. मोदी तुम्ही १८० वर्ष जगा आम्ही प्रार्थना करतो. तुमची माणस सुद्धा हे बोलणार नाहीत असे ओवेसी म्हणाले.

गेल्या साडेचार वर्षात तुमच्या सरकारने मुस्लिमांविरोधात जितक काम करायचं होतं तितकं केलं असे ते म्हणाले. तुमच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. ही संघटना काश्मीरला भारतव्याप्त काश्मीर बोलते. तिथे तुम्ही तुमच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवता. काश्मीर आणि काश्मिरी हिंदुस्थानचा हिस्सा आहे हे त्यांना ठणकावून सांगा असे ओवेसी म्हणाले. सर्वणांना १० टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली.