17 December 2017

News Flash

‘एमआयएम’चा उलटा प्रवास

नांदेडमध्ये अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी

संतोष प्रधान, मुंबई | Updated: October 13, 2017 1:18 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भिवंडी, मालेगाव, परभणीपाठोपाठ नांदेडमध्ये अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी

पाच वर्षांपूर्वी नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत ११ जागा जिंकून एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रात आपली चुणूक दाखविली तसेच नंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये यश मिळविले. त्याच नांदेडमध्ये यंदा एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. अलीकडेच झालेल्या भिवंडी, मालेगाव, परभणी, लातूरपाठोपाठ नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिली असून, एमआयएमला दूर ठेवले आहे.

२०१२ मध्ये झालेल्या नांदेडच्या निवडणुकीत ११ जागा जिंकून हैदराबादस्थित एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस-ई-इथेहादुल मुस्लिमन) साऱ्यांनाच चकित केले होते. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. औरंगाबाद महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले. मराठवाडय़ात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला चांगले यश मिळाले होते. मुस्लीमबहुल विभागांमध्ये एमआयएमच्या मतांचे प्रमाण वाढल्याने त्याचा काँग्रेसला फटका बसला होता. कारण एमआयएमचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढे काँग्रेसचे नुकसान होणार होते. एमआयएमला मत म्हणजे भाजपचा फायदा, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला. २०११च्या जनगणनेनुसार, राज्यात मुस्लीम लोकसंख्या ही ११.५४ टक्के असून, हा समाज काँग्रेसची हक्काची मतपेढी आहे. ही मते अन्यत्र गेल्याने काँग्रेसचे नुकसान झाले होते.

नांदेडमध्ये गेल्या वेळी ११ जण निवडून आले असले तरी त्यातील आठ जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी नव्हती. त्याचा एमआयएमला फटका बसला.

गेल्या सहा महिन्यांत झालेल्या विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला पाठिंबा मिळालेला नाही. भिवंडी-निजामपुरा व मालेगाव या मुस्लीमबहुल शहरांमध्ये एमआयएमचा प्रभाव पडला नाही. मराठवाडय़ातील लातूर, परभणीपाठोपाठ नांदेडमध्येही मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुस्लीमबहुल शहरे किंवा लक्षणीय मतदारांची संख्या असलेल्या प्रभागांमध्ये एमआयएमला मतदारांनी साथ दिलेली नाही. मुस्लीम मतदारांमधील हा बदल केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे झाल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. गोरक्षक, अल्पसंख्याक समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना त्यातून अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या मागे उभा राहू लागला आहे.

एमआयएमने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते त्याच नांदेडमध्ये पक्षाचा दारुण पराभव व्हावा ही चिंताजनक बाब आहे. पक्षाचे आठ नगरसेवक आधीच सोडून गेले होते. तसेच सत्तेत असताना काँग्रेसने एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे होणार नाहीत अशी व्यवस्था केली होती. तशी कबुली माजी आयुक्तांनीच दिली होती. राज्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी नसल्यानेही पक्षाचे नुकसान होते. महाराष्ट्रात फक्त प्रदेशाध्यक्ष आहे. अन्य कोणीही पदाधिकारी नाही. मतदारांचा पाठिंबा असला तरी पक्ष मते वळविण्यात अपयशी ठरतो. नेतृत्वानेच या साऱ्यांचा विचार करण्याची वेळ आली आहे.  इम्तियाज जलिल, आमदार एमआयएम

एमआयएमला मत म्हणजे भाजपला मदत हे मुस्लीम मतदारांच्या मनात बिंबले आहे. समाजात विद्वेषाचे वातावरण तयार करून स्वत:चा स्वार्थ साधायचा हे एमआयएमचे धोरण आहे. भाजप सरकारच्या धोरणांमुळे काँग्रेसच आपले रक्षण करू शकतो ही बाब मुस्लीम मतदारांमध्ये पसरली आहे. मुस्लीम मतदारांची मानसिकता बदलल्यानेच भिंवडी, मालेगाव, परभणी किंवा लातूर येथे काँग्रेसला यश मिळाले.  हुसेन दलवाई, खासदार काँग्रेस

First Published on October 13, 2017 1:18 am

Web Title: mim loss in nanded municipal corporation election 2017